स्पर्धा परीक्षेसाठी ‘आॅप्शन’ न ठेवता ध्येय ठेवा
By admin | Published: July 12, 2017 12:25 AM2017-07-12T00:25:06+5:302017-07-12T00:25:06+5:30
अनेक क्षेत्रातील अस्थिरतेमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून स्पर्धा परीक्षा देण्याची मानसिकता तयार करण्याबरोबरच कुठलाही दुसरा आॅप्शन न ठेवता...
देवा जाधवर : युनिक अकॅडमीतर्फे व्याख्यान
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अनेक क्षेत्रातील अस्थिरतेमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून स्पर्धा परीक्षा देण्याची मानसिकता तयार करण्याबरोबरच कुठलाही दुसरा आॅप्शन न ठेवता एकच ध्येय ठेवून स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यास यश निश्चित आहे, असे प्रतिपादन देवा जाधवर यांनी व्यक्त केले.
नियोजन व मेहनत यासोबतच अभ्यासाचं स्वत:चं वेळापत्रक तयार करुन अभ्यासात सातत्य व स्वत:वरचा विश्वास कायम ठेवण्याचे मोलाचे मार्गदर्शन युनिक अॅकाडमीचे प्राध्यापक देवा जाधवर यांनी विद्यार्थ्यांना केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मार्गदर्शन केंद्रात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त जात पडताळणी भंडारा सिध्दार्थ गायकवाड, उपायुक्त जात पडताळणी गोंदिया देवसुदन धारगावे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सिरीज सुरु करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पूणे येथील युनिक अॅकाडमीचे प्रा. देवा जाधवर यांचे चालू घडामोडी या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील अभ्यासिका समृध्द असून या अभ्यासिकेचा पूरेपूर लाभ घ्यावा. या ठिकाणी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना युनिक अॅकाडमीतर्फे टेस्ट सिरीज व व्याख्यान मोफत देण्याची घोषणा त्यांनी केली. त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात देण्यात येतील, असे जाधवर यांनी घोषित केले.
स्पर्धा परीक्षा हे यश किंवा अपयश याचे साध्य नसून ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण उन्नतीची प्रक्रीया आहे. सतत स्टडीमोडमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे. नोकरीचा आॅप्शन म्हणून स्पर्धा परीक्षेकडे न वळण्याचा सल्ला देतांनाच विषयाचे सखोल विश्लेषण व संदर्भ साहित्यांचा पूरेपूर वापर हा स्पर्धा परीक्षेचा सक्सेस मंत्र असल्याचे प्रा. जाधवर यांनी सांगितले. केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रम पूर्वी सारखा राहिला नसून त्यात मोठया प्रमाणात बदल झाला आहे. पाठांतराचे दिवस गेले असून आता व्यवहारीक ज्ञान व संदर्भ साहित्यावरील प्रश्न मोठया प्रमाणात समाविष्ठ केले जातात, असे त्यांनी सांगितले. केवळ तात्पूरते नियोजन करुन चालणार नाही तर वर्षभराचे नियोजन असणे गरजेचे आहे. आपण काय वाचतो याचे रिव्हीजन तितकेचे महत्वाचे आहे.