राष्ट्रसंतांचा मानवतेचा धर्म जागृत ठेवा
By admin | Published: December 1, 2015 05:03 AM2015-12-01T05:03:32+5:302015-12-01T05:03:32+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजातील प्रत्येक गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. कुठलाही नकारात्मक भाव
मुकुल कानिटकर यांचे आवाहन : परिसंवादात विचारवंतांची मांदियाळी
भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजातील प्रत्येक गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. कुठलाही नकारात्मक भाव त्यांच्या साहित्यात नव्हता. समाजातील उणिवा, दोष मांडतांना त्यांनी आईच्या काळजीने व मायेच्या भावनेने दखल घेतली. त्यांना श्रद्धेतून स्वावलंबी व सामर्थ्यवान समाज घडवायचा, उभा करायचा होता. स्वातंत्र्याला ६८ वर्षे लोटूनही समाजात विषमता कायम आहे. देश सरकारच्या हातात सोपवून आपण मोकळे होतो. पण देशाला चालविण्याची ताकत लोकशाहीच्या रुपाने जनतेच्या हातात आहे. माणसाला, समाजाला व राष्ट्राला जोडणारा मानवतेचा धर्म राष्ट्रसंतांनी सांगितला. गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांच्या विचारातून हा धर्म जागृत ठेवावा, असे आवाहन राष्ट्रसंत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व गुरुदेव विचार प्रचारक मुकुल कानिटकर यांनी केले.
गणेशपूर येथील अखिल सभागृहात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनातील पहिल्या परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. श्री गुरुदेव सेवा मंडळ, भारतीय विचारमंच, विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन आयोजित केले होते. यावेळी डॉ.कुमार शास्त्री, प्रा.तिर्थराज कापगते, प्रा.डॉ.श्याम धोंड उपस्थित होते. संमेलनाची सुरुवात राष्ट्रसंतांचा समाज, राष्ट्र व धर्मचिंतन या विषयावरील परिसंवादाने करण्यात आली. कानिटकर म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना तत्कालीन समाजातील वैषम्य दिसले. अंधश्रद्धा, अज्ञान, कुप्रथा यांनी गुरफटलेल्या समाजाला अंध:काराच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी श्रद्धा व अध्यात्माचा आधार घेतला. महाराजांचे साहित्य हे आध्यात्मित राष्ट्रवादाची संकल्पना मांडणारे आहे. डॉ.कुमार शास्त्री यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्यांमध्ये तुकडोजी महाराजांचे नाव अग्रेसर आहे. प्रा.तिर्थराज कापगते यांनी परिसंवादाचे दुसरे पुष्प गुंफले. समाज, राष्ट्र व धर्मचिंतन या तिन्हींचा त्रिवेणी संगम महाराजांच्या साहित्यात प्रतिबिंबीत होतो. क्रांतीकारक, बुद्धीवादी व पुरोगामी विचारांचे ते पुरस्कर्ते होते. महाराजांनी भक्तीपेक्षा श्रमाला अधिक महत्व दिले. आध्यात्मिक लोकशाहीचा प्रयोग प्रथम संत ज्ञानेश्वरांन केला. तुकारामांनी भ्रामक विचारांना छेद दिला. परंतु महाराजांनी दांभिकता, अंधश्रद्धा, कर्मकांडावर प्रहार करताना भक्ती, पूजा, नामस्मरणाची नवी संकल्पना व आचार संहिता मांडली.
तिसरे पुष्प प्राध्यापक श्याम धोंड यांनी गुंफले. ते म्हणाले, महाराजांना सत्य आचरण अपेक्षित होते. कर्मकांडापेक्षा त्यांनी कर्मवादाला जास्त महत्व दिले. महाराजांनी आपल्या साहित्यातून व्यक्तीधर्म, समाजधर्म, राष्ट्रधर्म जागविला. परिसंवादाचे संचालन प्रा.डॉ.हेमंत देशमुख यांनी केले. परिसंवाद सुरु होण्यापूर्वी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष प्रकाश महाराज वाघ, उद्घाटक लक्ष्मण नारखेडे, प्रमुख पाहुणे रुपराव महाराज वाघ, जनार्दन पंत बोथे, स्वागताध्यक्ष केशवराव निर्वाण, दुर्गादास रक्षक, हरिश्चंद्र बोरकर, नलिनी कोरडे, सीमा भुरे, रामराव चोपडे, अनिल चामरे, प्रा.सुभाष लोहे, वर्षा साकुरे, जया सोनकुसरे उपस्थित होते. साहित्य संमेलन व परिसंवादाला मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)