ताणतणाव नियंत्रणात ठेवा; मधुमेह, उच्च रक्तदाबाचा वाढतोय धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 02:06 PM2024-05-11T14:06:29+5:302024-05-11T14:07:30+5:30
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम : मधुमेहाने वयाचे बंधन नाकारले, प्रतिबंध गरजेचा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बदलती जीवनशैली, नोकरी, व्यवसायात निर्माण होणाऱ्या ताणाचा तसेच व वाढत्या स्पर्धेचा खूप मोठा परिणाम आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली पाहावयास मिळत आहे.
आता कोणत्याही वयाचे आणि वर्गवारीतील लोक मधुमेहाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे आगामी वर्षात या रोगाचे प्रमाण अधिक वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांमध्ये झपाट्याने लोकांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. त्याचा मोठा परिणाम आरोग्यावर होऊन जिल्ह्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे.
केवळ नियंत्रण हाच पर्याय
• साधारण १५-२० वर्षापूर्वी मधुमेह हा उच्च वर्गापुरताच मर्यादित असणारा आजार होता. त्यामुळे चेष्टेने त्याला श्रीमंतांचा आजारही म्हटले जायचे. पण, आता सर्वच स्तरांतील लोकांची जीवनशैली बिघडली आहे. त्यामुळे आता कोणत्याही आर्थिक वर्गात मधुमेहाचे रुग्ण आढळतात. चोरपावलांनी शरीरात प्रवेश करणाऱ्या या आजाराला नंतर फक्त नियंत्रित ठेवता येते. त्यातून पूर्ण बरे होता येत नाही. म्हणूनच योग्य वेळेत जीवनशैली सुधारून मधुमेह टाळणे हाच पर्याय आहे.
प्रतिबंधाचे कार्य अवघड
टाइप वन मधुमेह हा आयुष्यभराचा आणि जीवनशैलीशी निगडित आजार आहे. नियमित देखरेख आणि व्यायाम यांना सुयोग्य आहाराची जोड दिल्यास मधुमेह नियंत्रित होऊ शकतो. मात्र, तसे होताना दिसत नसून मधुमेहग्रस्तांची संख्या वाढत आहे.
मुले, महिला मधुमेहाच्या विळख्यात
बदलत्या जीवनशैलीमुळे बालकांमधील वाढता मधुमेह ही मोठी समस्या बनली आहे. वाढते जंकफूडचे प्रमाण आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा, यामुळे मधुमेह होण्यासाठी पूरक असे वातावरण तयार झाले आहे, चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजारांना मुलांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, महिलांमधील वाढता ताण हे त्यांच्यातील वाढत्या मधुमेहाचे मुख्य कारण आहे.
नवजात अर्भकांनाही मधुमेह
महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गर्भवती महिलांद्वारे होणाऱ्या बाळाला जन्मतःच मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. याचा
परिणाम म्हणजे नवजात बालकांचे कमी असणारे वजन, जन्माच्या वेळी कमी वजन असणाऱ्या बालकांना जास्त खाणे दिले जाते. त्यामुळे नवजात बालकांमध्ये मधुमेहाचा धोका निर्माण होतो.
ही आहेत मधुमेहाची कारणे
• कामाचा अधिक ताण
• डबाबंद पदार्थांचा अतिरेकी वापर चुकीचा आहार व अवेळी जेवण
• व्यायामाचा अभाव, योग व सकाळी फिरण्याचा अभाव
• गोड पदार्थांचे अतिसेवन
• व्यसनाधीनता
शारीरिक हालचाल नाही, बैठे काम करणे, जंकफूड जास्त प्रमाणात खाणे, कॉम्प्युटर, मोबाइल जास्त प्रमाणात वापरणे यामुळे मधुमेह वाढत आहे. त्यासाठी लोकांनी राहणीमान बदलणे आवश्यक आहे. तरच मधुमेहाचे प्रमाण कमी होऊ शकते.
- डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा. लोकांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे. मनावरील
ताण कमी करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार व योगासने करणे गरजेचे आहे. कमी झोप घेणे, व्यसनाधीनता, विभक्त कुटुंब पद्धती, वाढता एकटेपणा यामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत.
- डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.