बाळाचे आरोग्य ठणठणीत ठेवा; वेळीच मोफत लसीकरण करा !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:45 PM2024-05-14T13:45:01+5:302024-05-14T13:46:09+5:30
आरोग्य विभागाचे आवाहन: योग्य संगोपनासाठी वेळीच करावे लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बालमृत्यू कमी करण्याचा तसेच बाळांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. हा एक अत्यंत सोपा असा मार्ग आहे. लसीकरणामुळे रोग तर होत नाही, शिवाय बाळाला रोगजंतूंशी लढण्याची ऊर्जा प्राप्त होत असते. त्यामुळे बाळांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेळेत लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरणामुळे बाळाच्या आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जाऊ शकतात. त्यामुळे आरोग्य विभागाकडून बाळाच्या जन्मापासूनच वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ यावरील रोगप्रतिबंधक लस दिल्याने हे टाळता येते.
कोणत्या वयात कोणती लस
बाळाच्या जन्मापासूनच वेगवेगळ्ळ्या लसी दिल्या जातात. बीसीजी, त्रिगुणी, पोलिओ, गोवर, टायफॉइड, हिपॅटायटिस बी, हिपॅ- टायटिस ए, कांजण्या, धनुर्वात, न्यूमोनिया, संयुक्त लसी असे लसींचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते वेळापत्रकानुसार बाळाला दिले जातात.
बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण आवश्यक
लसीमुळे रोग निर्माण करणारे जिवाणू कमकुवत किंवा निष्क्रीय होतात. शरीरातल्या इम्यून सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारकशक्तीवर हल्ला करणाऱ्या विषाणूला ओळखण्यासाठी लस मदत करते. बाहेरून होणाऱ्या हल्ल्याला रोखण्यासाठी शरीर अँटीबॉडीज तयार करत असते. बाळ जन्माला आलं की सर्वाधिक काळजी ही त्याच्या आरोग्याची घ्यावी लागते. बाळाला लसीकरण करण्यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत लस उपलब्ध करून दिली आहे.
आजारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे
देवीसारख्या रोगाचा फैलाव कमी करण्यात लसीकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिओ या आजारापासूनही लसीकरणामुळे संरक्षण मिळते. काही लसींमुळे शरीरात निर्माण होणारी रोगप्रति- कारशक्ती काही काळानंतर कमी होते. त्यामुळे ठराविक अंतराने त्या लसी पुन्हा दिल्या जातात.
लसीकरणामुळे संक्रमणाचा धोका कमी
प्रसुतीपूर्व काळात मदर-टू-चाइल्ड ट्रान्समिशनमुळे होणारा हिपॅटा- यटीस बी विषाणू (एचबीव्ही) संसर्ग हा देशात एक चिंतेचा विषय ठरत आहे. वेळोवेळी तपासणी करून या गंभीर समस्येला प्रतिबंध करता येतो. हिपॅटायटीस बी लसीकरण करणे आवश्यक आहे.
अर्भकाला एचबीव्ही लसीचे ३ ते ४ डोस मिळावे. ज्याचा पहिला डोस शक्यतो जन्माच्या २४ तासांच्या आत दिला जातो. एचबीव्ही पॉझिटिव्ह मातांसाठी गर्भधारणेदरम्यान व्यवस्थापन, एचबीव्ही डीएनए व्हायरल लोड चाचणी आणि एचबीव्ही संसर्गाबाबत समुपदेशन आणि वैद्यकीय व्यवस्थापन आवश्यक आहे.
- डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. भंडारा.