दीड लाख ग्राहकांना मिळणार केरोसिनची सबसिडी
By admin | Published: March 19, 2016 12:25 AM2016-03-19T00:25:05+5:302016-03-19T00:25:05+5:30
स्वयंपाक गॅस सबसिडीच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने आता केरोसिनवर मिळणारी सबसिडीही थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
काळ्या बाजारातील विक्रीला बसणार चाप : १ एप्रिलपासून होणार योजनेची अंमलबजावणी
देवानंद नंदेश्वर भंडारा
स्वयंपाक गॅस सबसिडीच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने आता केरोसिनवर मिळणारी सबसिडीही थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ४५९ बीपीएल, अंत्योदय, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिका धारकांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या योजनेची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. यामुळे केरोसिनच्या काळ्या बाजारावर अंकुश लागणार आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाखांच्या घरात आहे. जिल्ह्यात एकुण १७ गॅस एंजसी आहेत. या एंजसींनी पुरवठा विभागाला दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ८४ हजार २९८ गॅस सिलिंडर धारकांची संख्या आहे. यात १ लाख ५० हजार २२७ घरगुती सिलिंडरधारकांचा समावेश आहे. ४० हजार ७५२ नागरीकांकडे गॅस सिलिंडर असलेतरी त्यांच्याकडे मात्र शिधापत्रिका नाही. जिल्ह्यातील काही एंजसीकडे १३ हजार ७७० सिलिंडरधारक हे परजिल्ह्यातील आहेत.
बरीच कुटुंब आजही पारंपरिक पद्धतीने स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करीत आहे. यामुळे लाकूड आणि करोसिनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना शिधापत्रिकेतून केरोसिनचे वितरण केले जाते. जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला जवळपास ६३६ किलो लिटर केरोसिन वाटप करण्यात येते. मात्र बऱ्याच लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत नसल्यामुळे त्यांच्या हिस्स्याचे केरोसिन काळ्या बाजारात विकल्या जाते. शिवाय आवश्यकता नसल्यामुळे लाभार्थ्यांकडूनही याकडे लक्ष दिले जात नाही किंवा तक्रारही केली जात नाही. शासनाच्या या आदेशानुसार आता प्रत्येक खऱ्या लाभार्थ्यांना केरोसिनचा लाभ मिळणार असून, केरोसिन वितरणातील गैरप्रकार टाळता येणार आहे. शासनाकडून केरोसिनची खरी किंमत ४० ते ४५ रुपये प्रतिलीटर आहे; मात्र सार्वजनिक वितरण व्यवस्थेत शिधापत्रिकाधारक व नागरिकांना केरोसिन सध्या १५ ते १७ रुपये प्रतिलीटर या दराने विकण्यात येत आहे. यातील २३ रुपये सबसिडी शासन स्वत: भरुन नागरिकांपर्यंत कमी दरात केरोसिन पोहोचवित आहे. शिधापत्रिकेवर प्रतिव्यक्ती दोन लिटर आणि तीन सदस्यांपेक्षा अधिक व्यक्तीचा परिवारासाठी चार लिटर केरोसिन दिले जाते. त्यामुळे शिधापत्रिकेवर केरोसिन खरेदी झाल्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यात २३ रुपये सबसिडी जमा करण्याच्या सूचना अन्न व नागरी विभागाने दिल्या आहेत.
प्रायोगिक तत्त्वावर योजनेची अंमलबाजवणी
नागपूर व अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना केंद्र शासनाकडून चालविली जात आहे, तर राज्य सरकारकडून भंडारा, गोंदिया, लातूर, नंदुरबार, नांदेड जिल्ह्यात योजना सुरु झाली आहे. १ एप्रिलपासून केरोसिनची सबसिडी शिधापत्रिकाधारकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शिवाय येथे योजना यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यात योजना सुरु केली जाणार आहे.
योजना राबविण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाले. सध्या नियमित केरोसिन घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक गोळा करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात साधारणपणे १ लाख २९ हजार ३०० शिधापत्रिका धारकांच्या बँक खात्यात केरोसिनची सबसिडी जमा होऊ शकते. सध्या जुन्या वितरण प्रणालीनुसार काम सुरु आहे.
- अनिल बन्सोड,
जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा