केसलवाडा-येडमाकोट रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:51+5:302021-06-16T04:46:51+5:30
केसलवाडा हे गाव शेजारील बयवाडा, खोपडा, लेदडा, मुरपार, सेलोटपार, मनोरा व येडमाकोट या गावांची मिनी बाजारपेठ असलेले गाव आहे. ...
केसलवाडा हे गाव शेजारील बयवाडा, खोपडा, लेदडा, मुरपार, सेलोटपार, मनोरा व येडमाकोट या गावांची मिनी बाजारपेठ असलेले गाव आहे. केसलवाडा गावात इयत्ता १ली ते १२वीपर्यंत शिक्षणाची सोय असल्यामुळे शेजारील गावातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयही येथे उपलब्ध असल्यामुळे शेजारील गावातील शेतकरी व मजूर आपले प्राणी उपचारांकरिता येथे घेऊन येतात. तिरोडा आगाराची तिरोडा-तुमसरमार्गे केसलवाडा ही मागील बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेली बससेवा या खराब व जीर्ण झालेल्या, तसेच ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यामुळे हल्ली बंद आहे. केसलवाडा ते येडमाकोट हा ३ किमीचा रस्ता ठिकठिकाणी उखडलेला असून, रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचून राहत आहे. परिणामी, प्रवाशांना आपले वाहन चालविताना फारच त्रास सहन करावा लागत आहे. केव्हाही अपघात होण्याची शक्यता या उखडलेल्या व ठिकठिकाणी खड्डे पडलेल्या रस्त्यामुळे नाकारता येत नाही. याकरिता रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी संबंधित गावातील नागरिकांनी केली आहे.