खैरीची प्रणाली दहावीत उत्तीर्ण झाली प्रथम श्रेणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:07 PM2019-06-10T22:07:14+5:302019-06-10T22:07:43+5:30
ऐन परीक्षेच्या काळातच वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला. वडिलांच्या मृत्युचे दुख:ख हृदयात ठेवत दहावीची परीक्षा दिली. दोन दिवसापुर्वी लागलेल्या निकालात खैरीपटची प्रणाली मेश्राम ६४.६० टक्के गुण घेवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. दहावीची गुणपत्रिका पाहताना वडिलांचे शब्द आठवले. अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऐन परीक्षेच्या काळातच वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला. वडिलांच्या मृत्युचे दुख:ख हृदयात ठेवत दहावीची परीक्षा दिली. दोन दिवसापुर्वी लागलेल्या निकालात खैरीपटची प्रणाली मेश्राम ६४.६० टक्के गुण घेवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. दहावीची गुणपत्रिका पाहताना वडिलांचे शब्द आठवले. अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा...
प्रणाली खेमराज मेश्राम लाखांदूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात दहावीची विद्यार्थीनी. ती दहावीत असताना एसटी महामंडळात चालक असलेले वडिल खेमराज यांना कर्करोग झाला. अशा परिस्थितीत तिने खैरी पट ते लाखांदूर जाणे-येणे करत नियमित अभ्यास केला. वडिलांचा आजार वाढत गेला. नागपूर येथे उपचार सुरू झाले. इकडे दहावीच्या परीक्षेची तारीख जवळ येत होती. वडिलांचा दुर्धर आजाराने संपूर्ण कुटुंब खचले असताना प्रणालीने आपला अभ्यास सुरू ठेवला. अशातच इंग्रजीच्या आदल्या रात्री ४ मार्चला खेमराजवर काळाने झळप घातली. त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. घरात वडिलांचे पार्थिव आणि दुसऱ्या दिवशी दहावीचा पेपर अशा अवस्थेत प्रणाली पुरती खचली होती. मात्र ज्या वडिलांनी तिला अभ्यासाचा कानमंत्र दिला त्यांचे शब्द तिच्या कानी पडत होते. बेटा, अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा. त्यामुळेच तिने रात्रभर वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून अभ्यास केला. दुसºया दिवशी परीक्षा केंद्रावर जावून इंग्रजीचा पेपर दिला. त्यानंतर वडिलांना अखेरचा निरोप दिला.
दु:खाचा डोंगर झेलत दहावीचा पेपर दिल्याने गुणवत्ता घसरण्याची शासंका होती. मात्र दोन दिवसांपुर्वी लागलेल्या दहावीच्या निकालात प्रणालीने बाजी मारली. ६४.६० टक्के गुण घेवून प्रणाली उत्तीर्ण झाली. तिने प्रथम श्रेणीत मिळविल्याचे माहित होताच शाळेसह गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिच्या कष्टाचे चीज झाले आणि वडिलांचे शब्दही तिने खरे ठरविले.
प्रणाली मेश्राम ही लाखांदूर येथे शिक्षण घेत असून आता तीला वडीलांचे स्वप्न पुर्ण करायचे आहे. मात्र मोलमजुरी करणाºया आईच्या कमाईवर तिच्या शिक्षणात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी प्रणालीला शिक्षणासाठी दत्तक घ्यावे अशी अपेक्षा आहे.
कौतुकाचा वर्षाव
प्रणालीने दहावीच्या परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के. खोब्रागडे, आर.एम. मुळे, संजय प्रधान, एस.डब्ल्यु. दिवटे यांनी तिचे कौतुक केले. पुढील शिक्षणासाठी तिला धीर देत सर्वच जण तुझ्या पाठीशी आहे, असे सांगितले.