खापरी गावाचे पुनर्वसन थंडबस्त्यात
By admin | Published: April 6, 2016 12:26 AM2016-04-06T00:26:19+5:302016-04-06T00:26:19+5:30
पूर्व विदर्भात हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोसेखुर्दचे नाव देशाच्या राजधारीपर्यंत पोहचले.
अशोक पारधी पवनी
पूर्व विदर्भात हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोसेखुर्दचे नाव देशाच्या राजधारीपर्यंत पोहचले. परंतू त्या प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या नागरिकांच्या समस्या गेल्या २७ वर्षात जैसेच आहेत.
पुनर्वसन झालेल्या नागरिकांच्या समस्या काही प्रमाणात सुटलेल्या असल्या तरी ज्या गावाचे पुनर्वसन अद्यापही व्हायचे आहे तेथील नागरिक त्रस्त आहेत. खापरी (रेहपाडे) गावासाठी गावठाण निश्चित व्हायचे असल्याने गावाचे पुनर्वसन थंडबस्त्यात आहे.
गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठविणे सुरु झाले तेव्हापासून खापरी (रेह) गावालगतच्या शेतात पाणी शिरले आहे. एका बाजूला गोसे प्रकल्पाचे पाणी व दुसऱ्या बाजूला उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील हिंस्त्र प्राण्याचा त्रास यामुळे खापरीकरांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. अधिकारी वर्गाकडून पुनर्वसनाचे आश्वासन तेवढे वारंवार मिळत आहे. कारवाई मात्र शुन्य आहे. ग्रामस्थांना त्यांच्याच गावात जायला अभयारण्याच्या प्रवेशद्वार एंट्री केल्याशिवाय जाता येत नाही हे केवढे दुर्भाग्य.
खापरी रेह गावासाठी सुरुवातीला वाही-गराडापार गावाजवळ अधिग्रहीत करण्याचे ठरले होते. जाहीरनामेदेखील प्रसिध्द झाले परंतु ते ठिकाण नंतर रद्द करण्यात आले. त्यानंतर खापरी रोडवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ जागेची पाहणी करुन गावठाणकरिता जागा निश्चित झाली पंरतु अभ्रकाचे खाणीसाठी जागा राखीव असल्याने प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले व ती जागासुध्दा मिळू शकली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. अलीकडे बेटाळा गावाजवळ जागेची पाहणी करण्यात आली परंतु दोन-तीन शेतकऱ्यांनी जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे खापरी (रेह) गावासाठी आवश्यक तेवढी जागा त्याठिकाणी उपलब्ध नाही या कारणास्तव बेटाळा शेतशिवारातील जमीन अधिग्रहीत करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे व पुनर्वसनात येण्याऱ्या अडथळ्यामुळे नागरिकांत पाहिजे त्यांना भुखंड व उर्वरितांना रोख रक्कम देण्यात यावी, असे सूर उमटू लागले आहेत. याचा आधार घेऊन गोसेखुर्द पुनर्वसन उपविभाग क्र. ९ वाहीचे सहाय्यक अभियंता यांनी सरपंच खापरी (रेह) यांना पत्र देऊन गावकरी स्वेच्छा पुनर्वसनास संमती देण्याकरिता ग्रामसभेत ठराव घेण्याबाबत असे सुचित केले. यावरुन गावात दोन मतप्रवाह निर्माण होऊन शेवटी त्यात राजकारण आले. पुनर्वसन करतांना गावाचे हित तसेच ग्रामस्थांचे हित दोन्ही महत्त्वाचे आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीचा आदर करुन पुनर्वसनाचे धोरण आखण्यात यावे व विलंब न लावता खापरी रेह गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले असून शासनाने याची दखल घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांत आहे.