खराशीकरांनी जोपासली १५८ वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:39 AM2021-09-06T04:39:22+5:302021-09-06T04:39:22+5:30
इंद्रपाल कटकवार भंडारा : हिंदू संस्कृतीमधील श्रावण मास हा अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो. आषाढ महिन्याची सांगता होताच, श्रावण ...
इंद्रपाल कटकवार
भंडारा : हिंदू संस्कृतीमधील श्रावण मास हा अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो. आषाढ महिन्याची सांगता होताच, श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिन्यात धार्मिक उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व असून केलेले पुण्यकर्म वाया जात नाही, अशी श्रद्धा आहे. याच श्रद्धेला जोपासून खराशीकरांनी श्रावण मासात १५८ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या दिंडी उपक्रमाची परंपरा कायम ठेवली आहे. भास्कर चेटुले व त्यांच्या कुटुंबीयांकडून ही परंपरा अविरतपणे जोपासली जात आहे.
गौरवशाली परंपरा म्हणून ओळख असलेल्या श्रावण मासानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रम घेतले जातात. भास्कर चेटुले यांच्या कुटुंबीयांकडून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. महिनाभर दिंडी आणि शेवट गोपाळकाला व महाप्रसादाने करण्याची प्रथा आहे. ही प्रथा आजही कायम असल्यामुळे खराशीवासीयांसाठी सुवर्ण अक्षराने लिहावे अशी बाब ठरत आहे. आध्यात्मिक व सात्त्विक वृत्तीचा शिरकाव बालगोपालांमध्ये होत आहे. हनुमान मंदिरात दिंडी पोहोचत्चत भाविकांगण दिंडीला जुळतात. आरती करून उपस्थितांना प्रसादाचे वितरण केले जाते. ही प्रथा चालविण्याचा व ती टिकवून ठेवण्याचा मान गावातील भास्कर चेटुले यांना जातो. त्यामुळेही श्रावण मासातील या दिंडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून ही दिंडी म्हणजे खराशीकरांसाठी एक ऐतिहासिक वारसा ठरली आहे. रविवारी श्रावण मास समाप्तीनिमित्त भजन, कीर्तन व गोपाळकाला करून महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
बॉक्स
टाळ, मृदुंगाच्या तालावर भजन
श्रावण महिन्याची सुरुवात होताच या दिंडीला सुरुवात होत असते. खराशी येथील भास्कर हरिश्चंद्र चेटुले यांच्या घरून दिंडीला प्रारंभ होतो. गतवर्षी कोरोनाचा काळ असल्यामुळे भास्कर चेटुले हे एकटेच दिंडी काढायचे. या वर्षी कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने त्यांच्या कुटुंबीयातील व अन्य मंडळींनी साथ देत ही परंपरा कायम ठेवली. या दिंडीत टाळ-मृदुंगाच्या तालावर भजन म्हणत बालगोपाल भजनी मंडळ व गावातील इतरही मंडळी सहभागी होतात. गावाला प्रदक्षिणा करीत असताना घराघरातील महिला-पुरुष या दिंडीचे टिळक लावून स्वागत करतात. गावातून भ्रमण करीत असताना महादेवाचे मंदिर आणि विठोबाचे मंदिर येथेही पूजन केले जाते. यानंतर हनुमान मंदिराकडे या दिंडीचे मार्गक्रमण होते.
कोट बॉक्स
श्रावण मासानिमित्त खराशी येथे सुरू असलेली १५८ वर्षांची ही अविरत परंपरा जोपासण्यामागे भास्कर चेटुले यांचा अनन्यसाधारण वाटा आहे. ही एक गौरवशाली परंपरा जोपासली जात आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
- डमदेव कहालकर, ज्येष्ठ नागरिक, खराशी