खरिपाची पीकपेरणी २१ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:14 PM2018-07-22T22:14:35+5:302018-07-22T22:15:01+5:30
गत दिड महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील लागवडीला वेग आला आहे. या आठवड्यातील कृषी विभागाच्या नोंदीनुसार ल्ह्यिात २१.७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. गतवर्षी या तारखेत केवळ पाच टक्के पेरण्या झाल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत दिड महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक व समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील लागवडीला वेग आला आहे. या आठवड्यातील कृषी विभागाच्या नोंदीनुसार ल्ह्यिात २१.७० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. गतवर्षी या तारखेत केवळ पाच टक्के पेरण्या झाल्या होत्या.
धान हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. धानपिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८० हजार ११९ हेक्टर आहे. यापैकी या आठवड्यात ३१ हजार २९२.३३ हेक्टरमध्ये धान लागवड करण्यात आली असून १७.३३ अशी टक्केवारी आहे. नर्सरी, आवत्या व रोवणी पध्दतीने धान लागवड केली जाते. यात नर्सरी पध्दतीने १६ हजार ८२५.५७ हेक्टर, आवत्या पध्दतीने ४ हजार ५०.५० हेक्टर तर रोवणी पध्दतीने २७ हजार २४१.८३ अशी एकूण ३१ हजार २९२.३३ हेक्टर क्षेत्रात धान लागवड झाली आहे.
जिल्ह्यात २ लाख ३ हजार ७४२ हेक्टर असे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यत एकूण ४४ हजार २०८.०१ हेक्टर म्हणजेच २१.७० हेक्टर क्षेत्रात पत्यक्ष पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने २२दिड महिन्याच्या कालावधीत खरीप हंगामातील पेरण्या समाधानकारक असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात १ लाख ८० हजार ११९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३१ हजार २९२.३३ हेक्टर क्षेत्रात धान लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी १७.३७ एवढी आहे. यात भंडारा तालुक्यात १ हजार ५५.५०, मोहाडी ३ हजार ५२३.८३, तुमसर २१७, पवनी ६ हजार ४०७,२ साकोली ४ हजार ७०२, लाखनी ६ हजार ६६५, तर लाखांदूर तालुक्यात ८ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रात धान लागवड करण्यात आली आहे.
कडधान्य लागवडीत भर
जिल्ह्यात कडधान्याचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ११,२२७ हेक्टर आहे. यात बांध्यावर तुरीचे पीक, १० हजार २९७.४३ हेक्टरमध्ये लावण्यात आले. भंडारा १,५३९.४४ हेक्टर, मोहाडी १,७५.९९, तुमसर १,१६९, पवनी १,५९९, साकोली ८१०, लाखनी १,४९९.५०, लाखांदूर तालुक्यात २,३११ हेक्टर क्षेत्रात ही लागवड करण्यात आली.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस
यावर्षी १ जून ते २१ जुलै या कालावधीत सरासरी ५२३.७ मिमी पाऊस झाला असून त्याची टक्केवारी १०६ आहे. मागील पावसाळ्यात याच तारखेपर्यत ३८१.६ मिमी पाऊस झाला होता. मात्र यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.
तुमसर पिछाडीवर
तुमसर तालुक्यात आजवर ५२७.२ मिमी पाऊस झाला. परंतु, लागवडीत हा तालुका माघारला आहे. २८ हजार ७५ हेक्टर लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र असून केवळ १ हजार ५४६ हेक्टरमध्ये प्रत्यक्षात पेरणी झाली. यात धान लागवड २१७ हेक्टरांत, कडधान्य लागवड १ हजार १६९, तेलबिया १२, हळद, अद्रक, मिरची व भाजीपाला १३८ हेक्टर अशी एकुण १ हजार ५४६ हेक्टर अशी लागवड झाली. चांगला पाऊस झालेला असताना या तालुक्यात खरीप पिकांच्या लागवडीत घट झाल्याचे दिसते. तर लाखांदूर तालुक्यात आतापर्यत सर्वाधिक लागवड झाली आहे. ३४ हजार ८०६ पैकी ११ हजार ४८६ हेक्टरांत खरीप पिकांची लागवड झाली आहे. तालुक्यात ५४१.३ मिमी असा ९८ टक्के पाऊस झाला.