दीड लाख रुपयांच्या खंडणीसाठी चक्क मुलासमोरच वडिलांचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 09:05 PM2023-07-24T21:05:22+5:302023-07-24T21:05:40+5:30
लाखनी पोलिसांनी तत्परता दाखवीत मुलाच्या तक्रारीवरून आरोपीला गजाआड केले.
लाखनी (भंडारा) : दीड लाख रुपयांच्या खंडणीसाठी चक्क मुलासमोरच वडिलांचे अपहरण करण्यात आले. ही थरारक घटना रविवारी पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्याच्या सिंधीपार-मुडीपार येथे घडली. यात लाखनी पोलिसांनी तत्परता दाखवीत मुलाच्या तक्रारीवरून आरोपीला गजाआड केले. यात तिरोडा येथे दाबून ठेवलेल्या त्यांच्या वडिलांची सुटका केली.
नरेश मारुती येळेकर (४७) असे अपहत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी धीरज प्रकाश बरीयेकर (३५)रा. संत रविदास वॉर्ड प्रभाग क्रमांक ३, तिरोडा याला अटक केली आहे. माहितीनुसार रविवारी पहाटे ३:३० वाजताच्या सुमारास सिंधीपार-मुंडीपार येथे नरेश येळेकर यांच्या घरी मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनाने अनोळखी दोन पुरुष व एक महिला त्यांच्या घरी आले. तसेच नरेश येळेकर यांना जबरदस्तीने चेक व आधारकार्ड मागितले. खंडणीसाठी अपहरण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कारमध्ये बसवून नेले. यावेळी अपहरणकर्त्यांनी नरेश यांचा मुलगा ओमीत याला मागे यायचं नाही, नाहीतर मारून टाकू अशी धमकी देत शिवीगाळही केली.
घडलेल्या घटनेची माहिती व ओमीतने लगेच लाखनी पोलिसांना दिली. पोलिसांनी क्षणाचाही विलंबना लावता अज्ञातआरोपी विरुद्ध भादंवीच्या ३६४, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे, पोलीस हवालदार आकांत रायपुरकर, पोलीस नाईक श्रीकांत वाघाये, शिपाई खोब्रागडे, कराडे, कहालकर यांचे पथक बनविण्यात आले. तसेच ओमीत याला सोबत घेऊन शोधासाठी रवाना झाले. याचवेळी ओमीतच्या मोबाईलवर खंडणीसाठी सातत्याने फोन येत असल्याने अपहरणकर्त्यांनी सुटकेसाठी दीड लाख रुपये खंडणी मागितली. यात धीरज बरीयेकर हा ओमीतशी फोनवर बोलत असताना सापळा रचून त्याला पकडण्यात यश आले. तपासाअंती धीरज बरीयेकर याने सांगितलेल्या ठिकाणावरून ओमीतच्या वडिलांची सुखरूप सुटका करण्यात आली. नरेश येळेकर यांना तिरोडा येथील एका रिकाम्या घरातील खोलीत मारझोड करून डांबून ठेवण्यात आले होते. तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे करीत आहेत.
सापळा रचून केली सुटका
रविवारी पहाटे घटना घडल्यानंतर अोमीत येळेकर याने क्षणाचाही विलंबन लावता तात्काळ लाखनी पोलीस ठाणे गाठले. घडलेला वृत्तांत सांगितला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता पथक तयार करून आरोपींच्या मागे लागले. लोकेशनच्या सहाय्याने आरोपीला पकडले. यातूनच नरेश येळेकर यांची सुखरूप सुटका करविण्यात लाखनी पोलिसांना यश आले. या घटनेने मात्र लाखनी तालुक्यात खळबळ उडवून दिली.