खून करून तरूणाचा मृतदेह जंगलात फेकला
By admin | Published: April 2, 2016 12:29 AM2016-04-02T00:29:27+5:302016-04-02T00:29:27+5:30
तालुक्यातील किन्ही येथील रहिवाशी निपेश ऊर्फ सोनु तुलाराम रामटेके (२२) हा १९ मार्चपासून बेपत्ता होता.
पोलीस निरीक्षक धुसर यांचे तडकाफडकी स्थानांतरण : चारगाव जंगलात आढळला मृतदेह, सहा संशयितांना घेतले ताब्यात
साकोली : तालुक्यातील किन्ही येथील रहिवाशी निपेश ऊर्फ सोनु तुलाराम रामटेके (२२) हा १९ मार्चपासून बेपत्ता होता. निपेशचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आल्याची तक्रार निपेशच्या वडीलांनी साकोली पोलीस ठाण्यात केली होती. तब्बल १८ दिवसानंतर निपेशचा मृतदेह चारगाव जंगल शिवारात शुक्रवारला सकाळी प्लॉस्टीकच्या पिशवीमध्ये कुजलेल्या स्थिीत आढळून आला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशीत हयगय केल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी त्यांचे तडकाफडकी स्थांनातरण केले.
साकोली तालुक्यातील किन्ही (मोखे) येथील निपेश रामटेके हा १९ मार्च रोजी टीव्ही पाहत होता. दरम्यान गावातील शैलेश गणवीर या तरुणाने भ्रमणध्वनी करुन निपेशला घरी बोलावले. त्यानंतर तो घरी परतलाच नाही, अशी तक्रार मृतकाचे वडिल तुलाराम रामटेके यांनी साकोली पोलीस ठाण्यात केली. माझ्या मुलाचे अपहरण करुन त्याचा खून केल्याचा संशयही त्यांनी तक्रारीत केला होता. तक्रारीवरुन पोलीस निपेशचा शोध घेत होते. मात्र त्याचा शोध लागला नव्हता.
आज शुक्रवारला सकाळी ८ वाजतादरम्यान चारगाव जंगल शिवारात चारगाव येथील एका गुराख्याने जनावरे चारण्यासाठी जंगलात गेला असता त्याला एका प्लॉस्टीक कापडात झाडाच्या वेलांनी बांधलेल्या स्थितीत कुजलेला मृतदेह दिसून आला. याची माहिती या गुराख्याने पोलीस पाटील लंजे यांना दिली. त्यांनी ही माहिती साकोली पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस ताफा व निपेशचे वडील कुटूंबीय चारगाव जंगलात पोहोचले.
निपेशचा मृतदेह पिवळ्या रंगाच्या प्लॉस्टीकच्या पोत्यात टाकुन त्याला झाडाच्या वेलानी बांधुन ठेवले होते. मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या स्थितीत होता. होते. अंगावरील कपडे हातातील कडा व अंगठी यावरुन निपेशची ओळख पटली. त्यानंतर शवविच्छेनासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले.
मात्र मृतदेह कुजलेले असल्यामुळे त्यांनी शवविच्छेदनास नकार दिला. त्यामुळे शवविच्छेदनासाठी मृतदेह नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक वाखरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साडी यांनी घटनास्थळावर भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)
अन्याय खपवून घेणार नाही- वाघाये
भंडारा : किन्ही (मोखे) येथील निपेश रामटेके हा तरूण १४ दिवसांपासून बेपत्ता होता. आज त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात रामटेके कुटुंबावर झालेला अन्याय खपवून घेणार नाही, असे सांगत दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी माजी आमदार सेवक वाघाये यांनी केली. याप्रकरणी निपेशच्या आईवडिलांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. चार दिवसानंतर मुलगा बेपत्ताच असल्याचे सांगूनही साकोलीचे पोलीस निरिक्षक सुरेश धुसर यांनी शोध घेतला नाही. याप्रकरणात धुसर यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. ( नगर प्रतिनिधी)
ठाणेदारांच्या निलंबनाची मागणी
मृतकाचे वडील तुलाराम रामटेके हे २० मार्च रोजी तक्रार देण्याकरिता गेले असता थानेदार सुरेश धुसर यांनी तुलाराम रामटेके यांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढले. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली याप्रकरणी धुसर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ठाणेदारांचे स्थानांतरण
निपेश रामटेके अपहरण व मृत्यू प्रकरणी चौकशीदरम्यान दिरंगाई केल्याप्रकरणी साकोलीचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांचे तडकाफडकी भंडारा कंट्रोल रुममध्ये स्थानांतरण करण्यात आले. त्यांच्या ठिकाणी उद्यापासून पोलीस निरीक्षक राऊत पदभार सांभाळणार आहे.
सहा संशयित ताब्यात
या प्रकरणात संशयित म्हणून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून सहाही जणांना भंडारा येथे पाठविण्यात आले आहे. तसेच या मृत्यूप्रकरणी कोणते वाहन वापरले गेले का याचाही शोध पोलीस घेत आहेत.