भंडाराचा राजा पोहोचवतोय वृद्धांना लसीकरण केंद्रावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:19+5:302021-05-26T04:35:19+5:30
भंडारा : लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ न शकणाऱ्या वृद्ध, अपंग आणि निराधार व्यक्तींच्या मदतीला भंडाराचा राजा अर्थात गणपती मंडळ धावून ...
भंडारा : लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ न शकणाऱ्या वृद्ध, अपंग आणि निराधार व्यक्तींच्या मदतीला भंडाराचा राजा अर्थात गणपती मंडळ धावून आले आहे. विविध वाॅर्डातून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी ऑटोरिक्षाची सुविधा तीही नि:शुल्क उपलब्ध करून दिली आहे.
सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असणाऱ्या भंडाराचा राजा या गणेश मंडळाने कोरोना संकटात अनेकांना मदतीचा हात दिला. पहिल्या लाटेत परप्रांतीय मजुरांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. दुसऱ्या लाटेतही त्यांनी मदतीचा हात पुढे केला. आता लसीकरण सुरू आहे; परंतु अनेक वयोवृद्ध या केंद्रापर्यंत जाण्यास असमर्थ ठरत आहेत. अशा वृद्धांसाठी भंडाराचा राजा गणेश मंडळाने ऑटोरिक्षाची सुविधा उपलब्ध केली आहे. कोणतेही भाडे न घेता वृद्धांना लसीकरण केंद्रापर्यंत सोडून दिले जाते आणि तेथून घरीही आणले जाते. शहरातील कानाकोपऱ्यांतील वृद्धांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरत आहे.
या सेवेसाठी मंडळाचे अध्यक्ष मंगेश वंजारी, जाॅकी रावलानी यांच्यासह अन्य सदस्य पुढाकार घेत आहेत. स्वार्थाशिवाय केले जाणारे हे काम समाजसेवी तरुणांच्या पुढाकाराने निरंतर सुरु असून या सुविधेसाठी भंडाराचा राजा मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाॅक्स
सामाजिक उपक्रमात अग्रेसर
भंडारा शहरातील मानाचा गणपती म्हणून भंडाराचा राजाची ओळख आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात हे मंडळ अग्रेसर आहे. रक्तदान शिबिरापासून ते विविध समाजोपयोगी कार्यक्रम या मंडळाने आतापर्यंत घेतले आहे. आता कोरोना संकटातही मंडळ धावून आले आहे. पहिल्या लाटेत अनेक मजुरांना त्यांनी नि:शुल्क भोजन सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता लसीकरणासाठी ऑटोरिक्षाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.