गणेशपूरचा राजा यंदा दीड दिवसांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:57 AM2019-08-31T00:57:34+5:302019-08-31T00:58:23+5:30
गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते. वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण शहरवासीयांचे आकर्षण म्हणजे गणेशपुरचा राजा. आनंदाची पर्वणी. दहा दिवस उत्साहाचे. विविध उपक्रमांचे आयोजन. मात्र यंदा सामाजिक भान जपत सन्मित्र गणेश मंडळाचे उत्सवाचा संपूर्ण निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्धार केला. त्यामुळे भंडारेकरांचा लाडका गणेशपूरचा राजा केवळ दीड दिवसांचा राहणार आहे.
गणेशपूर येथे गत काही वर्षांपासून भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा होतो. आकर्षक रोषणाई आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रत्येक भंडारेकराला गणेशोत्सवाची उत्कंठा लागलेली असते.
वैशिष्टयपूर्ण देखाव्यांसाठी गणेशपूरचा राजा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान, आरोग्य, नेत्रतपासणी शिबिर, स्वच्छता अभियान असे उपक्रम गणेशोत्सवाच्या काळात राबविले जातात. शासनाने एक लाख रूपयांचा पुरस्कार देवून संमित्र गणेश मंडळाचा गौरवही केला आहे. अशा या मंडळाने यंदा सामाजिक भान जोपासत गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली येथील महापुरात हजोरो कुटुंब उध्वस्त झाले. त्यांच्या मदतीसाठी सामाजिक भान ठेवत गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च होतो. हा खर्च टाळून संपूर्ण निधी पूरग्रस्तांना देण्याचा मंडळाने विचारपुर्वक निर्णय घेतला आहे. यामुळे पुराच्या आघातात उध्वस्त झालेले संसार सावरण्यास मदत होणार आहे. पूरपिडितांचे अश्रू याद्वारे पुसले जाणार आहे.
गणेशोत्सवात भव्य सजावट, देखावा, रोशनाई आणि आरास यांना भाटा दिला जाईल. बाप्पांची स्थापनाही अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येईल. या उत्सवातून वाचणारा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांना दिला जाईल.
एकीकडे हजारो बांधवांच्या डोळ्यात आश्वांचा महापूर आला असताना गणेशोत्सवावर पैशाचा अपव्यय करणे उचित ठरणार नाही. त्यासाठी या मंडळाने सामाजिक भान जोपासत पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा निर्धार केला. मंडळाला दरवर्षी सढळहस्ते मदत करणाऱ्या नागरिकांनी यावर्षीही पूरग्रस्तांसाठी मदत द्यावी. देणगीतून गोळा झालेला संपूर्ण निधी पूरग्रस्तांना पाठविला जाणार आहे.
मिरवणुकीतून मदत संकलन
गणेशोत्सवात सजावट, देखावे, रोशनाई आणि आरास न करता २ सप्टेंबर रोजी गणेशपूरच्या राजाची स्थापना केली जाईल. त्यादिवशी आरती, भजन, पूजन करून ३ सप्टेंबर रोजी बाप्पाची मिरणूक काढण्यात येईल. मिरवणुकीत डिजे आणि बँडला फाटा देण्यात आला आहे. डफडी आणि शहनाई या परंपरागत वाद्याचा सहभाग राहील. ही मिरवणूक शहरातील विविध भागातून जाईल. त्यावेळी पूरग्रस्तांसाठी निधी संकलीत केला जाणार आहे. या कार्याला भंडारेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन सन्मित्र गणेश मंडळाने केले आहे.
मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम गणेश उत्सवाच्या माध्यमातून राबविले आहे. यंदा कोल्हापूर, सांगली महापूर आला. त्या पूरग्रस्तांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.
-विनोद भुरे, अध्यक्ष सन्मित्र गणेश मंडळ, गणेशपूर भंडारा.