किटाडीत वर्ग सात अन् शिक्षक चार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 01:27 PM2024-07-25T13:27:47+5:302024-07-25T13:30:03+5:30
गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्हा परिषद शाळेला पदवीधर शिक्षक द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
किटाडी: लाखनी तालुक्यातील किटाडी येथील जिल्हा परिषद शाळेलाही जवळपास आठ-दहा महिन्यांपासून पदवीधर विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्ग सात आणि शिक्षक चार अशी विदारक स्थिती किटाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आहे. शाळेत पुन्हा तीन शिक्षकांची गरज आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, पालक व गावकऱ्यांकडून शाळेत तत्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची गटशिक्षणाधिकाऱ्यांना मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
किटाडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत एकूण २०७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सद्यःस्थितीत
शाळेत एकण चारच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सातही वर्गाच्या अध्यापनाचा भार आता केवळ चार शिक्षकांवरच आला आहे. सात वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवताना चार शिक्षकांची दमछाक होत आहे. तसेच शाळेचे कामकाजही कार्यरत असलेल्या चार शिक्षकांनाच करावे लागत आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नकसान लक्षात घेता आता तरी तातडीने शाळेला पदवीधर शिक्षक द्या, या मागणीचे निवेदन सरपंच कल्पेश कुळमते, उपसरपंच पंकज घाटबांधे, पोलिस पाटील प्रशांत धुर्वे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुंजीलाल चौधरी, शिक्षणतज्ज्ञ जागेश्वर निखारे यांच्यासह पालकांकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
"आपल्या स्तरावरून शिक्षकांच्या रिक्त जागांविषयी जिल्हा परिषदेला कळविले आहे. जिल्हा परिषदेकडून शिक्षकांची पूर्तता होताच किटाडी जिल्हा परिषद शाळेत तातडीने शिक्षकांची नेमणूक करण्यात येईल."
- सुभाष बावनकुळे, गटशिक्षणाधिकारी, पं.स., लाखनी.
"किटाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची वानवा आहे. चार शिक्षकांना सातही वर्गाना सांभाळावे लागत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होणार तरी कशी? असा प्रश्न पडतो. शिक्षकांअभावी शैक्षणिक कार्यात अडचण निर्माण होत आहे. याबाबत निवेदनाच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही."
- कुंजीलाल चौधरी, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, किटाडी.