मुख्याध्यापकांच्या कक्षात लिपिकाचा परिचरावर चाकूने हल्ला
By admin | Published: June 24, 2017 12:20 AM2017-06-24T00:20:44+5:302017-06-24T00:20:44+5:30
येथील जिल्हा परिषद शाळेतील लिपीक व परिचरात २० रूपयावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले.
सिहोरा जि.प. शाळेतील घटना : परिचर जखमी, आरोपी लिपीक फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड /तुमसर : येथील जिल्हा परिषद शाळेतील लिपीक व परिचरात २० रूपयावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. त्यानंतर लिपीकाने परिचरावर धारदार चाकूने हल्ला केला. ही घटना शुक्रवारला सकाळी १०.३० वाजता दरम्यान मुख्याध्यापकाच्या कक्षात घडली.
विकास चिंतामन भुरे (४२) रा.तुमसर असे जखमी परिचराचे नाव असून आशिष रामटेके (२६) रा.तुमसर असे आरोपी कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
सिहोरा स्थित जिल्हा परिषद शाळेत यातील आशिष रामटेके हा कनिष्ठ लिपीक पदावर तर फिर्यादी विकास भुरे हा परिचर पदावर कार्यरत आहे. हे दोघेही कर्मचारी शुक्रवारला सकाळी शाळा उघडून सफाईचे काम करीत होते. दरम्यान परिचर विकास भुरे हे दमल्याने मुख्याध्यापकाच्या कक्षातील खुर्चीवर आराम करीत होते. तेवढ्यात कनिष्ठ लिपीक आशिष रामटेके तिथे आले आणि भुरे यांना तुमसरला जाण्यासाठी तिकीटासाठी २० रूपये मागितले. परिचर भुरे यांनी त्याला प्रतिसाद दिला. तेवढयात आरोपी आशिष रामटेके हा शाळेबाहेर निघाला. त्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी भुरे यांना पैशाची मागणी करूनही तु पैसे देत नाही म्हणून चाकुसारख्या धारधार शस्त्राने (कटर ब्लेड) उजव्या पायाच्या मांडीवर वार केले. यात तो रक्तबंबाळ झाला.
एवढयात घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याच शाळेतील दुसरे परिचर योगीलाल कटरे यांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. त्यानंतर आरोपी कनिष्ठ लिपीक रामटेके हा फरार झाला. कटरे यांनी जखमी विकास भुरे यांना सिहोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिहोरा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. यातील आरोपी कनिष्ठ लिपीक आशिष रामटेके याच्याविरूद्ध भादंवि ३२४ कलमान्वये गुन्हा नोंदविला. फरार लिपिकाचा सिहोरा पोलीस शोध घेत आहेत. घटनेचा तपास ठाणेदार कदम यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार जयसिंग लिल्हारे हे करीत आहे.
कारवाईचा प्रस्ताव पाठवणार -तूरकर
सिहोरा जिल्हा परिषद शाळेत घडलेली घटना गंभीर आहे. एकीकडे शाळेला प्रगतीपथावर नेण्याची संकल्पना असताना हा प्रकार थेट मुख्याध्यापकाच्या कक्षात घडणे ही शोकांतिका आहे. या प्रकरणाची चौकशी शालेय व्यवस्थापन समितीकडून करण्यात येईल. यातील दोंषीवर कारवाईसाठी संबंधितांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे जिल्हा परिषद सदस्य तथा सिहोरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनेंद्र तुरकर यांनी सांगितले.