जीर्ण इमारतीत विद्यार्थी करताहेत ज्ञानार्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:43 PM2018-09-05T22:43:39+5:302018-09-05T22:44:00+5:30
कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनांमार्फत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या परिस्थितीतून दिसून येते.
देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनांमार्फत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या परिस्थितीतून दिसून येते.
'लोकमत'ने भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता येथे इयत्ता १ ते ४ पर्यंत शिक्षण घेतले जाते. येथे दोन शिक्षक असल्याचे दिसून आले. येथे वर्गखोल्यादेखील दोन आहेत. शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मुक्त मनाने जात असतात. परंतु शाळेची शिकस्त झालेली इमारत पाहून शिक्षक, पालकांसह त्यांच्याही निरागस मनाची घालमेल होते. प्रशासनाला मात्र त्याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र वाघबोडी येथील शाळेत पहावयाला मिळत आहे.
शाळेचे स्लॅब खचलेले असून इमारतीतून तुकडे पडलेले आहेत. शाळेच्या इमारतीला भेगा पडल्या असून दोनही वर्गखोल्या जीर्णावस्थेत आहेत. वाघमोडी येथे चार वर्ग असले तरी विद्यार्थ्यांना बसण्याची सोय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेशेजारी असलेल्या हनुमान मंदिरात ज्ञानार्जन दिले जात आहे. तिथे दोन वर्ग बसण्याची सोय केली आहे.
स्वयंपाकाच्या खोलीमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. पाऊस थांबल्यानंतर शाळेच्या वºहांड्यात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केली जाते. सुविधाअभावी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबींमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक दडपणाखाली आहे.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे प्रशासन मोठा अपघात होवून विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट पाहते काय, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. शाळेची दुरूस्ती करण्याची, नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर बडोले, उपाध्यक्ष विश्वनाथ वालदे, जाकीर शेख, गौतम तिरपुडे, अनिल शेख, जयेंद्र मरस्कोल्हे, राकेश कायते, विक्रम अंबादे, सारीका बडोले, प्रतिक्षा खोब्रागडे, आशिष बडोले आदींनी केली आहे.
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मात्र वाघबोडी येथील जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करावे लागत आहे. हा प्रकार जिल्ह्यासाठी अशोभनीय असून विद्यार्थ्यांना धोका झाल्यास याला जबाबदार कोण राहील, याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-मंगेश हुमणे, उपाध्यक्ष, तालुका काँग्रेस भंडारा.
राज्यशासन व केंद्र सरकार शिक्षणावर कोट्यवधी रूपये खर्च करीत असल्याचे छातीछोकपणे सांगत असले तरी वाघबोडीतील ही परिस्थिती सरकारचे दावे फोल ठरणारे आहे. वाघबोडी येथे दोन वर्गखोल्यांचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, अन्यथा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.
-जनार्दन निंबार्ते, सामाजिक कार्यकर्ता, धारगाव.