संस्कारातून शिक्षणाचा लळा लावणारी कोदुर्लीची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:00 AM2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:38+5:30
या राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील ओवी प्रमाणे पवनी तालुक्यातील कोदूर्ली येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक शाळा शिक्षणाची गंगा घराघरात पोहचवित आहे. सुसंस्कारातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लावणारी शाळा म्हणूनही ओळख झाली आहे. उदात्त व उत्तम विचार मणी बाळगून शिक्षक व गावकरी विद्यार्थी विकासाकरिता तन, मन, धनाने प्रयत्न करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘याच साठी शिक्षण घेणे,
की जीवन जगता यावे सुंदरपणे,
दुबळेपण घेतले आंदने,
शिक्षण त्यासी म्हणो नये’,
या राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील ओवी प्रमाणे पवनी तालुक्यातील कोदूर्ली येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक शाळा शिक्षणाची गंगा घराघरात पोहचवित आहे. सुसंस्कारातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लावणारी शाळा म्हणूनही ओळख झाली आहे.
उदात्त व उत्तम विचार मणी बाळगून शिक्षक व गावकरी विद्यार्थी विकासाकरिता तन, मन, धनाने प्रयत्न करीत आहे. एकीकडे पाश्चिमात्य शिक्षणाला अनुकरण करणाऱ्या कॉन्व्हेंटच्या शिक्षणाची चढाओढ सुरू असताना कोदूर्लीच्या शाळेने सुसंस्काराचे धडे देत पटसंख्या कायम राखली आहे. तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या शाळेत बाहेरगावचे विद्यार्थीही शाळेत प्रवेश घेण्यासाठी उत्सूक आहेत. वैनगंगेच्या काठावर वसलेल्या १७०० लोकसंख्या असलेल्या कोदूर्ली गावात या शाळेची स्थापना १९४९ साली झाली. आजपर्यंत २१९१ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून समाजसेवेचे व्रत घेतले आहे. विविधांगी उपक्रम राबवून वेळोवेळी यासाठी पवनीचे गटशिक्षणाधिकारी नरेश टिचकुले, केंद्र प्रमुख रवी रायपुरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रेरणा घेत शाळेत स्पर्धा परीक्षा, दैनंदिन आचरण, आनंद मेळावा, कथाकथन यासह सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. यासाठी शिक्षक गण प्रयत्नरत आहेत.
बदलांचे नवे आव्हान
शैक्षणिक बदलांचे नवे आव्हान पेलविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक डी.यु. वाडीभस्मे यांच्यासह सोना रामटेके, प्रितम भुरे, विशाल बोरकर, विमोश चव्हाण आदी शिक्षकगण व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रयत्नरत आहे. यासह ग्रामस्थांचे सहकार्य यामुळेच शाळेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत आहे. जिल्हा परिषद शाळांचा चेहरा मोहरा बदलण्यात शाळेने कुठलेही कसर ठेवली नाही. सुसज्ज पटांगण यासह निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थीनही मनमोकळेपणाने विद्यार्जन करीत आहेत.
केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार व बदलत्या काळानुसार आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार केले जात आहे. भविष्यातील समस्या विद्यार्थ्यांनी स्विकारल्या पाहिजे, यावर आधारित शिक्षणावर आमचा भर आहे.
- डी.यु. वाडीभस्मे, मुख्याध्यापक
शिक्षक व गावकरी यांच्या सहकार्याने शाळा विकासाचा नवा उच्चांक आम्ही सर्व गाठल्याशिवाय राहणार नाही.
- विठ्ठल समरीत, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.
गोळा केली गाववर्गणी
कोदूर्लीची शाळा डिजिटल करण्यासाठी ग्रामस्थांनी चंग बांधला होता. यात शाळा व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेसाठी ५१ हजार रूपयांची गाव वर्गणी गोळा करण्यात आली आहे.