कोंडवाडा कुणासाठी, कशासाठी?
By admin | Published: August 5, 2016 12:38 AM2016-08-05T00:38:36+5:302016-08-05T00:38:36+5:30
१४ लाख लोकसंख्येच्या जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात समस्यांचा अंबार आहे. अतिक्रमणाच्या कोंडीत सापडलेल्या ...
मोकाट जनावरे रस्त्यावर : रहदारीला अडथळा, नगरपालिकेचे दुर्लक्ष
इंद्रपाल कटकवार भंडारा
१४ लाख लोकसंख्येच्या जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात समस्यांचा अंबार आहे. अतिक्रमणाच्या कोंडीत सापडलेल्या या शहरात मोकाट जनावरांचा रस्त्यावरचा वावर नागरिकांच्या जीवावर उठला आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर फिरतात, तासन् तास उभी राहतात. याचा फटका रहदारीला बसत आहे. बसस्थानक परिसरासमोर असलेला कोंडवाडा कुणासाठी असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
भंडारा शहराची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या, वाढती वाहनांची संख्या यासर्व बाबी नागरी सुविधांसाठी महत्वपूर्ण आहेत. शहरातील मुख्य समस्या असल्या तरी मोकाट जनावरांचे रस्त्यावर बस्तान असणे ही गंभीर समस्या बनत चालली आहे.
शहरातील लालबहादूर शास्त्री चौक ते त्रिमुर्ती चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक ते लायब्ररी चौक, नागपूर नाका राष्ट्रीय महामार्ग ते कारधा लहान पूल, शास्त्रीनगर चौक ते खांबतलाव चौक ते रजनीनगर परिसर रस्त्यावर मोकाट जनावरांचे बस्तान दिसून येते. शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरू नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने कोंडवाड्याची व्यवस्था केली आहे. काही वर्षांपुर्वी बसस्थानक समोरील पश्चिम दिशेला कोंडवाडा होते. सद्यस्थितीत हा कोंडवाडा बसस्थानकासमोर असलेल्या दूरसंचार कार्यालयाच्या बाजुला आहे. जवळपास १० हजार चौरस फूट जागेत असलेल्या या कोंडवाड्याची दूरवस्था झालेली आहे. यात असलेली इमारतीचीही जीर्ण अवस्था झाली आहे.
पालिकेने दवंडी देऊनही जनावरे मोकाटच
रस्त्यावर जनावरे बस्तान मांडून असल्याने रहदारीचा फटका सर्वांनाच बसतो. ही बाब लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासनाने पाच दिवसांपुर्वी भंडारा शहरात आॅटोतून दवंडी पिटली. यात शहरातील पशुपालकांनी मालकीची जनावरे रस्त्यावर सोडू नये, ती ताब्यात घेण्यात यावी अन्यथा नगरपालिका प्रशासन कारवाई करेल, अशी सूचना देण्यात आली होती. याला पाच दिवसांचा कालावधी लोटला तरी जनावरे काही रस्त्यावरून हटलेली नाहीत. परिणामी ती जनावरे पशुपालकांची नाहीत, असे जाणवते. पालिका प्रशासन ही समस्या आतातरी ही समस्या गांभीर्याने सोडविणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तर कांजीहौस कुणासाठी!
सद्यस्थितीत कांजीहौसच्या प्रवेशद्वारावर नगरपालिका प्रशासनाने कुलूप ठोकले आहे. मुख्य रस्त्यावर जनावरे फिरत असताना कांजीहौस कशासाठी उभारण्यात आला, असा प्रश्न भंडारेकरांना पडला आहे. रहदारीला अडथळा निर्माण होत असताना पालिका प्रशासन या मोकाट जनावरांचा कांजीहौसमध्ये बंदोबस्त का करीत नाही, असा प्रश्न आहे.