रक्तदानाने जन्मदिवस साजरा करणारे ‘कुकडे’ कुटुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:04 PM2018-02-27T23:04:45+5:302018-02-27T23:04:45+5:30

वाढदिवस म्हटले की आप्तस्वकीय व मित्राची मेजवानी. पैशाचा चुराडा असेच चित्र नजरेसमोर उभे राहते.

The 'Kukade' family celebrating birthdays by blood donation | रक्तदानाने जन्मदिवस साजरा करणारे ‘कुकडे’ कुटुंब

रक्तदानाने जन्मदिवस साजरा करणारे ‘कुकडे’ कुटुंब

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमत प्रेरणावाट : ६१ वेळा केले रक्तदान, आजारी डॉक्टरांचे वाचविले प्राण

आॅनलाईन लोकमत
भंडारा/मोहाडी : वाढदिवस म्हटले की आप्तस्वकीय व मित्राची मेजवानी. पैशाचा चुराडा असेच चित्र नजरेसमोर उभे राहते. परंतु प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाºया ‘कुकडे’ परिवाराने अनेकांचे जीव वाचविले आहेत.
दिलीप कुकडे हे नोकरीनिमित्त भंडारा जिल्हा रूग्णालयात दूरध्वनी यंत्रचालक या पदावर कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्हा रूग्णालयात १९९१ ला त्यांची नियुक्ती झाल्यानंतर तिथे एका व्यक्तीच्या पत्नीला रक्ताची गरज होती. त्यांचे कुटुंबिय रक्तदान करायला घाबरत होते. गर्भाशयाचे आॅपरेशन असल्याने रक्ताची गरज होती. अशा परिस्थितीत दिलीप कुकडे हे पुढे येऊन रक्तदान केले. तेव्हापासूनच रक्तदान करण्याचा त्यांचा प्रवास सुरु झाला.
या रक्तदानाच्या प्रवासात त्यांची पत्नी विनयना कुकडे यांनी त्यांना साथ दिली. ३० जूनला त्यांचा जन्मदिवस व १० फेब्रुवारी रोजी लग्नाचा वाढदिवस असे वर्षातून दोनदा ते रक्तदान करून कुकडे कुटुंबिय ‘वाढदिवस’ साजरा करीत आहे.
दिलीप कुकडे यांनी आतापर्यंत ६१ वेळा रक्तदान करून समाजात आदर्श निर्माण केला आहे. २००७ मध्ये चंद्रपूर जिल्हा रूग्णालय कार्यरत असताना तेथील शल्यचिकित्सक डॉ.दासटवार यांना डेंग्यू आजाराने ग्रासले होते. त्यात ते कोमात गेले. त्यांना प्लाझ्मा द्यायचा होता.
याची माहिती होताच दिलीप कुकडे व त्यांच्या तीन मित्रांनी डॉ.दासटवार यांना रक्त दिले. परंतु त्याच्या १५ दिवसापूर्वीच त्यांनी रक्तदान केले होते. तरीही जीवाची पर्वा न करता त्यांनी रक्तदान केले. रात्रभरात डॉक्टर कोमातून बाहेर आले. हा क्षण त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरला. या घटनेतूनच मला रक्तदान करण्याची ऊर्जा मिळाल्याचे कुकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महाआरोग्य शिबिरात केले सन्मानित
प्रत्येक जन्मदिवशी व लग्नाचा वाढदिवस रक्तदानाने ते साजरा करतात. अतिशय गरजूंना रक्ताची गरज भासली की आपण रक्तदान करीत असतो. गरजू रूग्णांना वेळीच रक्त मिळाले तर त्याचा पुनर्जन्म होतो. रक्तदान करताना मदतीचा हात दिला पाहिजे. आजही ते नियमित रक्तदान करतात. आईवडीलांची ही आदर्श परंपरा कायम ठेवण्याची ईच्छा त्यांच्या मुलीने व्यक्त केली. रक्तदान केल्यामुळे आरोग्य विभागाने त्यांचा नेहमी सन्मान केला आहे. अशातच २५ फेब्रुवारी रोजी जिल्हा रूग्णालयात दिव्यांग साहित्य वितरण व महाआरोग्य शिबिरात दिलीप कुकडे यांचा आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते उपस्थित होते.

Web Title: The 'Kukade' family celebrating birthdays by blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.