महानगरातील मजुरांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:00 AM2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:46+5:30
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. हजारो मजूर महानगरात अडकले आहेत. पहिला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. त्यामुळे अनेक मजूरांनी धीर धरत तोपर्यंत महानगरातच मुक्काम केला. मात्र लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने मजूरांचा धीर सुटला. महानगरात हाताला काम नाही उपाशीपोटी किती दिवस राहायचे, अशा विचार करित मजूरांचे जत्थे गावाकडे निघाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनने महानगरात अडकलेले मजुरांचे जत्थेच्या जत्थे राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील विविध मार्गावरुन दररोज जात आहे. कोरोना प्रभावित क्षेत्रातून प्रवास करणारे मजूर चेकपोस्टला चुकवून पायदळ जात असल्याचे चित्र रोजचे झाले आहे. या मजूरांची कुठेही तपासणी होत नसून बिनधास्तपणे सीमा पार करताना दिसत आहेत. मात्र त्यांना रोखताना कुणीही दिसत नाही.
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. हजारो मजूर महानगरात अडकले आहेत. पहिला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. त्यामुळे अनेक मजूरांनी धीर धरत तोपर्यंत महानगरातच मुक्काम केला. मात्र लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने मजूरांचा धीर सुटला. महानगरात हाताला काम नाही उपाशीपोटी किती दिवस राहायचे, अशा विचार करित मजूरांचे जत्थे गावाकडे निघाले.
वाहनाची कोणतीही व्यवस्था नसल्याने महिला पुरूष आणि लहान मुले डोक्यावर ओझे घेवून आपल्या गावाकडे निघाले आहेत. भंडारा जिल्ह्यातून जाणारे मजूर छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशातील आहेत. हैद्राबाद, नागपूरसह विविध शहरातून हे मजूर आपल्या गावाकडे जाताना दिसत आहे. गत पाच सहा दिवसांपासून गावाकडे जाणाऱ्या मजूरांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे.
भंडारा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरुन पहाटे ५ वाजतापासून मजूरांचे जत्थे जाताना दिसून येतात. रात्रभर कुठेतरी मुक्काम करायचा सकाळच्यावेळी प्रवास करायचा आणि दुपारी पुन्हा आराम करुन पुढच्या प्रवाशाला निघायचे. असा त्यांचा दिनक्रम आहे. रस्त्यात या मजूरांना विविध सामाजिक संस्थांकडून भोजनासह विविध मदत केली जाते.
कोरोना प्रभावित महानगरातून प्रवास करणारे मजूर भंडारा या ग्रीन झोनमधील जिल्ह्यातून प्रवास करतात. त्यामुळे त्यांचा प्रवास तसा धोकादायक आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात नऊ ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले असून त्याठिकाणी पोलिसांसह आरोग्य पथक तैनात असते. मात्र त्यांना चुकवून हे मंडळी आपल्या गावाचे दिशेने कुच करताना दिसून येते.
शेल्टर होममध्ये मुक्काम अन् सकाळी पलायन
रस्त्यावरुन जाणाºया मजूरांना पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध शेल्टर होममध्ये आणले जाते. त्याठिकाणी भोजनासह निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेक मजूर याठिकाणी रात्रभर मुक्काम करतात आणि पहाटेच आपल्या गावाकडे निघतात. शेल्टरहोममधून सकाळी पलायन करणाºया मजूरांकडे कुणाचेही लक्ष नसते. भंडारा शहरातील तुमसर, साकोली मार्गासह जिल्ह्यातील पवनी, अड्याळ, लाखांदूर आदी भागातूनही मजूर जाताना दिसून येतात. या मजूरांना वेळीच आळा घालून त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने या मजूरांच्या जत्थ्यांना आवर घालून त्यांची योग्य व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पालांदूरमध्ये गुन्हा
ट्रकमधून मजूरांची वाहतूक केल्याप्रकरणी लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारधा ते पालांदूर असा २४ मजूरांना प्रवास करण्यात आला होता. चालकावर गुन्हा दाखल झाला. मात्र मजूर पायी आपल्या गावाकडे निघून गेले.