लाखनी ग्रामीण रुग्णालयात मुलभूत सुविधांचा अभाव
By admin | Published: March 10, 2017 01:33 AM2017-03-10T01:33:55+5:302017-03-10T01:33:55+5:30
लाखनी हा तालुक्यातील सर्वात मोठा गाव असून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेला आहे. त्यामुळे येथे नेहमीच हजारो लोकांची वर्दळ असते.
शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष : राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा
भंडारा : लाखनी हा तालुक्यातील सर्वात मोठा गाव असून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेला आहे. त्यामुळे येथे नेहमीच हजारो लोकांची वर्दळ असते. यासर्व बाबी लक्षात घेऊन लाखनी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु मागील २ वर्षापासून येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्त नसल्यामुळे लाखनी ग्रामीण रुग्णालयास अखेरची घरघर लागलेली आहे.
मागील २ वर्षापासून येथे येणारे रुग्ण मुलभूत सुविधांपासून वंचित तर आहेतच परंतु मागील काही वर्षापासून रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपात नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना सामान्य रुग्णालय भंडारा येथे संदर्भीय करण्यात येत असल्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना नाहकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. येथे विद्यालय, महाविद्यालय लाखनी येथे असून येथील बाजारपेठ राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर असल्यामुळे येथे नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात.
अशात ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेकदा रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्यामुळे व त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे संदर्भीय केल्यामुळे अनेक रुग्ण जीव गमवावा लागत आहे. ही बाब अत्यंत निंदनयी आहे. अशा अनेक कारणास्तव लाखनी येथील ग्रामीण रुग्णालय हे केवळ शोभेची वास्तू ठरली आहे.
ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे कायमस्वरूपी तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम हे ग्रामीण रुग्णालयात रुग्ण सेवा देत आहेत. त्यामुळे लाखनी तालुक्यातील गरोदर माता, नवजात शिशु, अंगणवाडीतील बालकांची तपासणी व शालेय विद्यार्थ्यांची तपासणी खोळंबलेली आहे.
करीता आपणास विनंती करण्यात येत आहे की, परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभ होईल या उदात्त हेतुने लाखनी ग्रामीण रुग्णालयाकरीता खालील मागण्या १ महिन्यात पूर्ण करण्यात याव्यात. अन्यथा नाईलाजास्तव धरणे आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील. या विषयावर अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला जाईल.
लाखनी येथे कायमस्वरूपी किमान ४ वैद्यकीय अधिकारी २४ तास नियुक्त करण्यात यावे, ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे कायमस्वरूपी स्त्री रोग तज्ञांची नियुक्ती करण्यात यावी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना आठवड्यातील एक दिवस ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची तपासणी करीता नियुक्त करण्यात यावे, बंद असलेले एक्स रे मशीन सुरू करून एक्स रे टेक्नीशियनची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी, रुग्णालयात जनरेटर उपलब्ध करून देण्यात यावा, ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांची प्रसुतीची पुरेपुर व्यवस्था करण्यात यावी, सोनोग्राफीची व्यवस्था करून सोनोलॉजिस्ट उपलब्ध करण्यात यावा, गरोदर माता, नवजात शिशु, अंगणवाडीतील बालकांची तपासणी व शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी, जिल्हा शल्य चिकित्सकांनी ग्रामीण रुग्णालयास भेट द्यावी, अशी मागणी लाखनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, लाखनी शहराध्यक्ष धनू व्यास, तालुकाध्यक्ष उर्मिला आगाशे, जेष्ठ कार्यकर्ते बाळा शिवणकर, विनोद आगलावे, नितीन निर्वाण, गुणवंत दिघोरे, सचिन निर्वाण, अनिल बावनकुळे आदींचा समावेश होता.
(नगर प्रतिनिधी)