स्मशान घाटावर सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:23 AM2019-09-01T00:23:07+5:302019-09-01T00:23:35+5:30
स्मशान घाटावर मृतदेह जाळण्यासाठी एकमात्र शेड आहे. तीन दशकांपूर्वी गावातील गौतमी महिला मंडळाच्या सदस्यांनी स्मशान घाटावर असलेली अडचण लक्षात घेऊन लोकवर्गणीतून सदर शेड उभारले होते. सदर शेड पडक्या अवस्थेत आहे. तीन दशकात गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : स्मशान घाटावर आवश्यक सुविधांचा अभाव आहे. अनियमित साफसफाई व परिसरात टाकलेल्या घाणीमुळे सर्वत्र घाण पसरली आहे. ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षित धोरणाने नागरिकांना नाहक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुटुंबातील सदस्य गेल्याच्या दुख घेऊन स्मशान घाटावर येणाऱ्या नातलग व आप्तस्वकीयांना असुविधांचा फटका पडत आहे.
स्मशान घाटावर मृतदेह जाळण्यासाठी एकमात्र शेड आहे. तीन दशकांपूर्वी गावातील गौतमी महिला मंडळाच्या सदस्यांनी स्मशान घाटावर असलेली अडचण लक्षात घेऊन लोकवर्गणीतून सदर शेड उभारले होते. सदर शेड पडक्या अवस्थेत आहे. तीन दशकात गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. या काळात अनेक विकासकामे स्मशान घाटावर झाली. पण शेडची खस्ता हालत आजही जैसे थे आहे. शेडच्या वरच्या भागातून खपले पडतात. अनेक भागातील प्लास्टरने जागा सोडली आहे. सदर शेड धोकादायक अवस्थेत आहे.
गावाच्या लोकसंख्येचा विचार करता येथे किमान दोन शेड असणे आवश्यक आहे. माजी सरपंच संजय मिरासे यांच्या काळात त्यांनी लोकवर्गणीतून स्मशान घाटाचे सौदर्यीकरण करवून जुन्या शेडच्या बाजूला मृतदेह जाळण्यासाठी नवीन ओटा तयार केला होता. त्याबरोबर रोहयो अंतर्गत अनेक काम व परिसरात वृक्षरोपण करण्यात आल्याने आज येथे वृक्षाचा डोलारा उभा आहे. पण नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने स्मशान घाटाची अवस्था भंगार झाली आहे. जुन्या शेडच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या ओट्याची अवस्था फार वाईट आहे. ओट्याच्या चारही बाजूला घाण व पावसाचे पाणी साचून राहत असल्याने त्याचा उपयोग करता येत नाही. नागरिकांना बसण्यासाठी दोन निवारे आहेत. पण देखभाल दुरुस्तीअभावी त्यांची अवस्था वाईट आहे. स्मशान घाट परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढला आहे. ग्रामपंचायतमार्फत संकलित कचरा व घाण या परिसरात टाकत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.
भगवान शंकराच्या मूर्तीकडे दुर्लक्ष
स्मशान घाट परिसरात लोकवर्गणीतून भगवान शंकर यांची मूर्ती बसवण्यात आली. पूर्वीच्या काळात या मूर्तीची नियमित देखभाल दुरुस्ती होत होती. मात्र गत अडीच वर्षांपासून देखरेख व्यवस्था नसल्याने मूर्तीची अवहेलना होत आहे. मूर्तीच्या अनेक भागातील पेंट निघत आहे. श्रद्धेने पुजणाऱ्या मूर्तीची देखभाल दुरुस्तीअभावी दिवसेंदिवस मूर्तीची अवस्था वाईट होत आहे.