धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:00 AM2020-11-23T05:00:00+5:302020-11-23T05:00:30+5:30
खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याने धानाचे विक्री करीता पुढाकार घेण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदानासह अनेक सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. धान खरेदी केंद्राचा श्रीगणेशा अद्याप करण्यात आलेला नाही. केंद्र सुरू होण्याआधीच केंद्रावर विक्रीसाठी धानाची पोती पोहचली असल्याने अवकाळी पावसाचा फटका पोत्याना बसला आहे. धान आणि पोत्यांना खुद्द शेतकऱ्यांनाच सुरक्षा कवच देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.
खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याने धानाचे विक्री करीता पुढाकार घेण्यात येत आहे. या परिसरात बपेरा, देवसरा, बिनाखी, चुल्हाड, सिंदपुरी, टेमनी, सुकली नकुल, सिहोरा, वाहनी, हरदोली, करकापूर, पिपरी चुनही, गोंडीटोला, दावेझरी, गोंदेखारी गावात धानाची खरेदी केंद्रावर करण्यात येत आहे. धान साठवणूक करण्यासाठी खाजगी गोडाऊन घेण्यात येत आहेत.
परिसरात असणारे गोडाऊनमधील गेल्या वर्षातील धानाचे पोती रिकामे करण्यात आली आहेत. धान खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांची गोची होत आहे. दरम्यान धान खरेदी केंद्र सुरु होणार असल्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी धानाचे पोती केंद्रावर आणले आहेत. धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचे आधी गोडाऊन रिकामे केल्याने एक चांगला संदेश शेतकऱ्यांत गेला आहे. धान खरेदी करताना गोडाऊनची समस्या निर्माण होणार नाही. धान खरेदी नंतर पोती गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवली जातील. परंतु सध्या गोडाऊन बाहेर शेतकऱ्यांनी धानाचे पोती उघड्यावर ठेवली आहेत. या पोत्यांना सुरक्षित करण्यासाठी ताडपत्रीचे आच्छादन दिले आहेत.येथे सुरक्षा करण्यासाठी चौकीदार नाहीत. परिसरात खरेदी केंद्रावरून धान पोती चोरी होण्याचे घटना आजवर घडल्या नाहीत. यामुळे केंद्र संचालक बेफिकीर राहत आहेत. या पोत्यांना जनावरांची भीती आहे. कीटक पोत्यातील धानाची नासाडी करीत आहेत. नुकसानग्रस्त धानाचा फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. याशिवाय धान खरेदी करताना घट काढली जात आहे. यातही शेतकऱ्यांची गोची केली जात आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी विलंब होत असल्याने व्यापाऱ्यांना फायदा होत आहे. सिहोरा परिसरातील भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
केंद्रावर मनुष्यबळाचा अभाव
धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुटालूट होत असल्याचे वारंवार आरोप होत आहेत. अतिरिक्त २ ते ३ किलो धानाची घट म्हणून कापले जात आहेत. यात रिकामे पोत्याचा वजन जोडले जात आहे. यावरून शेतकऱ्यांनी धान आणायचे कसे ? केंद्रावर धानाचे पोती उचल करणाऱ्या हमालांना दरानुसार राशी दिली जात आहे. असे असताना पुन्हा शेतकऱ्यांकडून हमाली वसुल करण्याचे आरोप होत आहेत. धान खरेदी केंद्रावर पारदर्शकता ठेवली पाहिजे. यात शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे. यंदा शेतकरी चौफेर संकटात सापडला आहे. पूर, परतीचा पाऊस, मावा तुडतुडा, अवकाळी पाऊस, एकरी ३ पोते धानाचे उत्पादन झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याची गरज आहे.
चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात एकही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. वाहनी केंद्रावर धान पोती उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. यामुळे तात्काळ धान खरेदी सुरु करण्यात यावी.
- प्रल्हाद आगाशे, सरपंच, करकापूर