धानविक्रीपोटी लाखो रुपये थकीत
By admin | Published: May 25, 2015 12:42 AM2015-05-25T00:42:34+5:302015-05-25T00:42:34+5:30
आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकीत आहेत.
बंद : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
साकोली : आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकीत आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांच्या गरजा वाढल्या. अशात धान खरेदी केंद्रातील थकबाकी कधी मिळेल, याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्र को-आॅप. मार्केटींग फेडरेशनच्या सब एजन्ट म्हणून येथील श्रीराम भात गिरणी हमीभाव धान खरेदी केंद्र चालविते. २०१४-१५ या वर्षातील खरेदी हंगामात चार कोटी ११ लाख ३० हजार ३४४ रुपये किंमतीच्या धानाची खरेदी केली. सध्या उन्हाळी धानाची खरेदी सुरु आहे. मागील महिन्यात सुमारे ३० हजार रुपये किंमतीच्या धानाची खरेदी केली. सध्या उन्हाळी धानाची खरेदी सुरु आहे. मागील महिन्यात सुमारे ३० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्याचे ६८ लाख रुपये शेतकऱ्यांना येणे आहे. सर्वसाधारण प्रतीचे धान १,३६० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरु आहे.
श्रीराम सहकारी भातगिरणी येथे दररोज ७०० ते ८०० क्विंटल धानाची आवक सुरु आहे. यातील जवळपास ५०० क्ंिवटल धानाचे रोज मोजमाप होते. त्यामुळे रोज येणाऱ्या शेतकऱ्यांना मोजणीसाठी दुसऱ्या व तिसऱ्या दिवसांपर्यंत थांबून राहावे लागत आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी हेच एकमेव आधारभूत धान खरेदी केंद्र असल्यामुळे येथे शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यातच निकटवर्तीय व कुटूंबातील सदस्यांच्या लग्नसमारंभासाठी जाण्याचीही लगबग सुरु आहे. रोजची आवक वाढत असल्याने खरेदी केंद्राच्या आवारात धानाच्या पोत्यांचे ढीग लागले आहेत. विक्रीसाठी आणलेल्या धानाचे लवकर मोजमाप व्हावे, या अपेक्षेने येणाऱ्या शेतकऱ्यांना येथे ताटकळत राहावे लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी एकोडी व पळसगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुर करावे. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांची आतापर्यंत ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे. (तालुका प्रतिनिधी)