तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अभाव
By Admin | Published: November 20, 2015 01:34 AM2015-11-20T01:34:37+5:302015-11-20T01:34:37+5:30
लाखनी तालुका निर्मितीला १४ वर्ष पूर्ण होऊ न ही रिक्त पदांची निर्मिती न झाल्याने कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे.
पालांदूर : लाखनी तालुका निर्मितीला १४ वर्ष पूर्ण होऊ न ही रिक्त पदांची निर्मिती न झाल्याने कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता कामाचा व्याप पाहता पदांचा अनुशेष भरुन काढणे अगत्याचे आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या निष्क्रियतेमुळे १४ वर्षात एकही पदाची निर्मिती होऊ शकली नाही. लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर अगदी ३ महिन्यात शक्य आहे. परंतु उदासिनता वाढल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
निवडणूक विभाग, निराधार योजनेला स्वतंत्र कर्मचारी नाही. त्यांच्यावर अधिकचा भार वाढत आहे. सेवाभाव यामुळेच कमी झाल्याने भ्रष्टाचाराला आमंत्रण दिले जाते. शासन-प्रशासनाला कळते पण वळत नाही हेच म्हणावे लागते. गल्ली ते दिल्ली एकहाती सत्ता असूनही रेंगाळलेली कामे होत नसल्याने जनतेमध्ये कमालीची नाराजी आहे. रस्ते-इमारती बांधून विकास होणार का? याचा विचार लोकप्रतिनिधींना करायचा आहे., असा सवाल होत आहे. सामान्य व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ज्या-ज्या घटकांची गरज आहे ते प्रथमत: करणे अगत्याचे आहे. पण तसे न झाल्याने याही शासनाचे ‘येरे माझ्या मागल्या’ असेच म्हणावे लागेल. तालुक्याचा बेधडक विकासाभिमुख नेतृत्वाची खरी गरज आहे. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण लोकप्रतिनिधींनी करुन तत्परता दाखविण्याची मागणी लाखनी तालुकावासियांनी केली आहे. (वार्ताहर)