कोविड केअर केंद्रात स्ट्रेचर, फ्लो मीटर, जनरेटरचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:35 AM2021-05-10T04:35:23+5:302021-05-10T04:35:23+5:30
लाखांदूर : कोरोनाबाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणासह उपचारासाठी येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रात ऑक्सिजनसह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध ...
लाखांदूर : कोरोनाबाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणासह उपचारासाठी येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रात ऑक्सिजनसह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, रुग्णाला दाखल करतेवेळी आवश्यक असणारे स्ट्रेचर व ऑक्सिजन फ्लो मीटर, जनरेटरचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांसह आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
लाखांदूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले. या केअर केंद्रात ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, व्हेंटिलेटरसह अन्य सुविधा उपलब्ध आहे. कोरोनाबाधित गंभीर व वृद्ध रुग्णांना कोविड केअर केंद्रात दाखल करतेवेळी आवश्यक असलेले व्हिलचेअर अथवा स्ट्रेचर उपलब्ध नाही. येथे जवळपास २५ ऑक्सिजन सिलिंडर आहेत. परंतु, त्यासाठी आवश्यक फ्लो मीटर कमी आहेत. याप्रकरणी शासन, प्रशासनाने तत्काळ दखल घेत कोविड केअर केंद्रात आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
कोविड केअर केंद्रात जनरेटरची आवश्यकता
येथील कोविड केअर केंद्रात असलेल्या मशीन विजेच्या सहाय्याने सुरु केल्या जातात. मात्र, वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर मशीन बंद पडतात. वीज खंडित झाल्यानंतर येथे कोणतीही सुविधा नाही. रात्रीच्या वेळी तर अंधार असतो तसेच ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी येथे जनरेटर देण्याची मागणी होत आहे.