लाखांदूर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:33 AM2021-04-12T04:33:00+5:302021-04-12T04:33:00+5:30
लाखांदूर : यंदाच्या उन्हाळी हंगामात तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, लागवडीखालील पिकांना ...
लाखांदूर : यंदाच्या उन्हाळी हंगामात तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, लागवडीखालील पिकांना आवश्यक युरिया खत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतचे वातावरण असून, तालुक्यात युरिया खताचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामात जवळपास ६,९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची तर काही हेक्टर क्षेत्रात खोडवा ऊस, भाजीपाला, मूग यासह अन्य उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आली आहे. या लागवडीनुसार लागवडीखालील शेतपिके उमेदीत असताना तालुक्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड होत आहे.
दरम्यान, खरिपात विविध कीड़रोगांमुळे पिकांची हानी होऊन उत्पादकतेत घट झाल्याने ही घट भरुन काढण्यासाठी तालुक्यात विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील एकाही कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पीक कर्ज घेऊन शेती करणारा या भागातील शेतकरी तूर्तास खत टंचाईमुळे हतबल झाल्याचे सांगितले जात आहे.
याची शासनाने तत्काळ दखल घेऊन उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स
दोन-तीन दिवसात खत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शासनाने युरिया खताचा पुरवठा न केल्याने तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, येत्या दोन-तीन दिवसात जिल्ह्यात युरिया खताची रॅक लागणार असल्याने तालुक्यात युरिया खत उपलब्ध होण्याची शक्यता काही कृषी केंद्र चालकांनी वर्तवली आहे.