माहितीअभावी विद्यार्थी शनिवारी पोहोचले शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:32 AM2021-03-22T04:32:18+5:302021-03-22T04:32:18+5:30
रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, त्याची ...
रावणवाडी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, त्याची अंमलबजावणी शनिवार (दि.२०)पासून करण्यात आली. मात्र, याबाबत कित्येक विद्यार्थ्यांना माहिती नसल्याने विद्यार्थी शाळेत पोहोचले होते. त्यांना याबाबत माहिती देऊन परत पाठविण्यात आले.
राज्यात कोरोनाने कहर केला असून, आता जिल्ह्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशात सुरक्षात्मक पाऊल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १९) जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये येत्या ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी शनिवार (दि.२०)पासून करावयाची होती. त्यानुसार शाळा-महाविद्यालय उघडण्यात आले नाही. मात्र, तडकाफडकी निघालेल्या या आदेशाबाबत माहिती नसल्याने जिल्हा परिषद, तसेच काही खासगी शाळांतील कित्येक विद्यार्थी व शिक्षक शनिवारी शाळेत पोहोचल्याचे आढळले.
शाळा बंद असल्याने काही वाट बघून ते परतून गेले, तर काही ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती देऊन परत पाठविले. जिल्ह्यातील काही शाळांतील विद्यार्थी बाधित झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
पालक आपल्या पाल्यांना मास्क लावून शाळेत पाठवितात. शाळा बंद असल्याच्या माहितीअभावी शनिवारी चारगाव, मुरपार, रावणवाडी, सिरपूर व मोगर्रा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मास्क न लावताच आढळले.