भंडारा पोलीस दलातील लेडी सिंगम योगीता जांगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:20+5:30
योगीताचे अख्खे कुटूंब पोलीस दलात कार्यरत आहेत. वडील कपूरचंद जांगडे हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. तर भाऊही पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस परिवारात जन्म झालेल्या योगीतावर लहान पणापासूनच गुन्हेगारांविषयी प्रचंड चीड निर्माण झाली. महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्या महाविद्यालयीन जीवनात पेटून उठायच्या.
देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात कायद्याचे शस्त्र हाती घेऊन भल्या-भल्या गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या येथील योगीता जांगडे पोलीस दलातच नाही तर भंडारा जिल्ह्यात लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जातात. गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या आणि सर्वसामान्यांना मित्रत्वाची वागणूक देणाऱ्या या लेडी सिंघमच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली. मुंबई येथे झालेल्या एका सोहळ्यात त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस शौर्य पुरस्कार प्रदान केला. या पुरस्काराने पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
योगीताचे अख्खे कुटूंब पोलीस दलात कार्यरत आहेत. वडील कपूरचंद जांगडे हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. तर भाऊही पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस परिवारात जन्म झालेल्या योगीतावर लहान पणापासूनच गुन्हेगारांविषयी प्रचंड चीड निर्माण झाली. महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्या महाविद्यालयीन जीवनात पेटून उठायच्या. अशातच २००६ मध्ये त्यांची भंडारा जिल्हा पोलीस दलात निवड झाली. सुरुवातील वाहतूक शाखेत काम केले. योगीताचे राहणीमान लेडी सिंगम सारखे आहे. बॉयकट केस, डोळ्यावर काळा चष्मा आणि दुचाकीवर स्वार होऊन त्या एखाद्या गुन्हेगारासमोर पोहचतात तेव्हा त्याला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. खून, महिला अत्याचार, तस्करी, दरोडे यासारख्या गंभीर गुन्ह्याचा शोध लावण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.
योगीता जांगडे यांना गुन्हे आणि गुन्हेगारांबाबत प्रचंड चीड आहे. त्यात महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार सहनच होत नाही. कुठेही अशी घटना घडली की त्या जाऊन धडकतात. यासोबतच त्या सायबर सेल, मानवाधिकार, महिला व सामाजिक संघटनांच्या कार्यात नेहमी मार्गदर्शन करतात. महिला व मुलींनी आत्मनिर्भर व्हावे, आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड द्यावे आणि अन्यायाविरुद्ध दाद मागावी असे योगीता जांगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.