तलाव कोरडे, गावागावात पाण्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:01:09+5:30
यावर्षी कडक उन्हाळा तापू लागताच लहान स्वरुपाच्या तलावांनी जानेवारी महिन्यात नांगी टाकली. तर मध्यम स्वरुपाच्या तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तलावांवर आधारित पाणी पुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्याचे पाणी उपबल्ध करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कमी खोलीची विहिरी सुद्धा कोरड्या पडल्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी पारा ४६ अंशावर चढताच करडी परिसरातील मध्यम तलावांना कोरड पडली आहे. पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने जनावरे व गरजांसाठी आवश्यक पाण्याबरोबर गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. मागील तीन वर्षात तत्कालीन शासनाने पाणी टंचाई व भूगर्भातील पाणी साठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरु केली. परंतु तरीही करडी परिसरात योजनेचा फारसा परिणाम अजूनही दिसून येत नाही.
मध्यम स्वरुपाच्या तलावात पर्याप्त जलसाठा निर्माण करण्यात ही योजना फारशी यशस्वी ठरताना दिसून आली नाही. योजना फक्त शासकीय यंत्रणापुरतीच योजना मर्यादित ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. योजनेत लोकसहभाग संपल्याने कंत्राटदारांसाठी योजना पर्वणी ठरल्याचे सांगितले जाते.
यावर्षी कडक उन्हाळा तापू लागताच लहान स्वरुपाच्या तलावांनी जानेवारी महिन्यात नांगी टाकली. तर मध्यम स्वरुपाच्या तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तलावांवर आधारित पाणी पुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्याचे पाणी उपबल्ध करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कमी खोलीची विहिरी सुद्धा कोरड्या पडल्यात. तर मध्यम खोलीच्या विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गात आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून खोदकाम झालेले नाले आज उथळ आहेत. खोदलेली माती नाल्यांच्या काठावरच टाकल्याने तसेच माती पसरविण्यात न आल्याने नाल्याची पाणी साठवण क्षमता वाढलेली नाही. तलावातून कंत्राटदारांनी शासकीय यंत्रयांना हाताशी धरून काळेबेरे केल्याने पाहिजे तसा उपसा झालेला नाही. परिणामी यावर्षी चांगला पाऊस झालेला असतानाही नाले व मध्यम स्वरुपाचे तलाव पाण्याविना मे महिन्यातच कोरडे पडले आहेत. तर सिंचनामुळे मोठ्या स्वरुपाचे तलाव जून महिन्यातच चटका बसताच कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या संतुलनाचा परिणाम भविष्यात भोगावा लागण्याची शक्यता असल्याने आजच कायमस्वरुपी जलसाठे तयार होण्यासाठी विशेष योजनांची व लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे.
पर्यावरण संतुलनासाठी सहकार्याची गरज
वाढते तामपान व घटते पर्जन्यमान यामुळे मागील काही वर्षापासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना दुबार पेरणी शेतकºयांना करावी लागते आहे. शेकडो हेक्टर शेती वेळेवर पाऊस न पडल्यास पडीत राहते. रोवणीपर्यंतची शेतकºयांनी केलेली मेहनत व खर्च खंडीत आणि अत्यल्प पावसामुळे वाया जात आहे. या सर्व बाबींचा विचार करता पाणी संकटावर मात करण्यासाठी पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतीष्ठीत नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे व झाडांना जगविणे सर्वांच्या हिताचे ठरणारे आहे.