लाखांदूरचे सुपुत्र संतोष बेदरे अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:42 PM2018-08-29T22:42:26+5:302018-08-29T22:42:44+5:30
भारतीय भूदलाचा जवान आणि लाखांदूरचा सुपुत्र संतोष बेदरे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी साश्रू नयनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘संतोष बेदरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्येकांच्या डोळ्यातून अश्रूधारा ओघळत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : भारतीय भूदलाचा जवान आणि लाखांदूरचा सुपुत्र संतोष बेदरे यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी साश्रू नयनाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘संतोष बेदरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिली तेव्हा प्रत्येकांच्या डोळ्यातून अश्रूधारा ओघळत होत्या.
लाखांदूर प्लाँट येथील संतोष विठ्ठल बेदरे हा २००१ मध्ये भारतीय दलात सहभागी झाला होता. गत १७ वर्षांपासून तो बाँबे ११६ इंजिनियरिंग रेजीमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होता. अरुणाचल प्रदेशातील टिपागड येथील सीमेवर तो कार्यरत होता. देशात सर्वत्र २६ आॅगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना जवान संतोष बेदरे यांचा आजाराने दुर्देवी मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त लाखांदूर येथे कळताच गावावर शोककळा पसरली.
अरुणाचल प्रदेशातून संतोषचे पार्थीव मंगळवारी १२ वाजता लाखांदूर येथे पोहचले. त्यावेळी अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरासमोर प्रचंड गर्दी झाली होती. बुधवारी सकाळी १० वाजता त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. चुलबंद नदीच्या तिरावर शासकीय इतमामात आणि हवेत फैरी झाडून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट नितीन पांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्चना मोरे, उषा मधुकर कुकडे, नगराध्यक्ष भारती दिवटे, तहसीलदार संतोष महल्ले, गटविकास अधिकारी देवीदास देवरे, उपसभापती शिवाजी देशकर, राजेश बांते, अविनाश ब्राम्हणकर, वामन बेदरे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रा.पी.एम. ठाकरे, नरेश खरकाटे, रामचंद्र राऊत, नूतन कांबळे, बालू चन्ने, पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी जवान संतोष बेदरे यांची पत्नी नंदा बेदरे, मुलगा भावेश बेदरे, मुलगी उर्वी बेदरे, आई पावबता बेदरे यांच्यासह बाँबे इंजिनियरिंगचे जवान, सैनिक बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
लाडक्या सुपुत्राला निरोप देताना अश्रू अनावर
भारतीय सैन्य दलातील हवालदार संतोष बेदरे यांना अखेरचा निरोप देताना परिसरातील नागरिकांना अश्रू अनावर झाले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गार्ड आॅफ आॅनर, शोक सलामी, बाजू शस्त्र आणि हवेत फैरी झाडण्यात आल्या. त्यावेळी वातावरण शोकाकूल झाले होते. पत्नी नंदा बेदरे आणि भावेश व उर्वी या दोन मुलांसह आई पारबताबाई यांचे अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावत होते. आपल्या लाडक्या सुपुत्राला श्रद्धांजली देण्यासाठी लाखांदूर येथील शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.