‘कागुत’ च्या माध्यमातून दिसेल लाखांदूरचे टॅलेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:19 AM2019-09-01T00:19:55+5:302019-09-01T00:20:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर या झाडीपट्टी क्षेत्राला झाडीपट्टी व्यावसायिक नाटकांचा वारसा लाभलेला आहे. झाडीपट्टीतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर या झाडीपट्टी क्षेत्राला झाडीपट्टी व्यावसायिक नाटकांचा वारसा लाभलेला आहे. झाडीपट्टीतील दर्जेदार नैसर्गिक अभिनय करणारे कलाकार, निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ यांना मोहित होऊन पुणे, मुंबईकडील व्यवसायिक, चित्रपट निर्माते झाडीपट्टीमध्ये चित्रपट निर्मिती करीत आहेत, त्यात आपल्या परिसरातील तरुण पुढाकार घेत आहेत.
लाखांदूर येथील दोन हुन्नरी तरुणांनी 'जित्या शॉर्ट' चित्रपट तयार करून तालुक्याचे नाव महाराष्ट्रात गाजविले होते, याच टीमच्या सर्व सदस्यांनी एक वर्ष परिश्रम करून प्रशांत रामटेके, सोमेश्वर चौधरी दिग्दर्शित 'कागुत' हा तब्बल एक तासाचा लघुचित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. ‘कागुत’चे चित्रीकरण मुख्यत: लाखांदूर तालुका आणि भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात झालेले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व सामाजिक विषयावर भाष्य करणारे सोमेश्वर चौधरी यांनी लिहिलेले, जयंत काटकर यांनी आपल्या आवाजात गायलेले व सचिन कवासे यांनी संगीतबद्ध केलेले ‘बंद पडलाय सार’ हे भावस्पर्शी गीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. सदर गीत मधुरिका साऊंड स्टुडिओ नागपूर येथे शब्दबध्द, रेकार्ड करण्यात आलेला आहे.
चित्रपटात भिकाजी शहारे, अम्मल हुमणे यांनी प्रमुख भूमिका केली आहे. सुनील निंबेकर, गोपाल प्रधान, विशाल मस्के, चंदू मस्के, हिरालाल बोन्द्रे, जितेंद्र दोनाडकर, दिनेश प्रधान, मदन प्रधान, बोधिका मेश्राम, राजेश नंदेश्वर, भारत मेहंदळे, सचिन भोयर, वैशाली रामटेके, प्रभू ठाकूर, शेखर कोयडवर, अनु मूलचंदानी, निखिल वासनिक, सोमेश्वर चौधरी, प्रशांत रामटेके यांनी सहाय्यक कलाकार म्हणून काम केलेले आहे.
यु ट्युबवर दिसणार
कागुत चे मोशन पोस्टर, टीजर, ट्रेलर आणि बंद पडलाय सार हे गाणे प्रदर्शित करण्यात आलेले असून १९ सप्टेंबर रोजी ‘कागुत’ हा संपूर्ण लघुचित्रपट यु ट्युबवर पाहण्यास मिळणार आहे. लेखन, एडिट सिनेमॅटोग्राफी सोमेश्वर चौधरी, फिल्म एडिटिंग, डिजाईन प्रशांत रामटेक, कला गोपाल प्रधान, लाईट्स जितेंद्र दोनाडकर, साऊंड दिनेश प्रधान यांनी केले.
झाडीपट्टी जिल्ह्यात चित्रीकरण
'कागुत' चित्रपटाची विशेषत: म्हणजे चित्रपट पुणे, मुंबई आणि तेथील लोकच तयार करू शकतात हा समज आहे. तो मोडीत काढत यात स्थानिक तंत्रज्ञ आणि सर्व नवोदित कलाकारांना घेऊन झाडीपट्टीत चित्रीकरण करून एका ज्वलंत सामाजिक विषयावर प्रकाश टाकणारी दर्जेदार कलाकृतीची निर्मिती करण्यात आलेली आहे.