लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:35 AM2021-01-03T04:35:06+5:302021-01-03T04:35:06+5:30
यंदाच्या खरिपात तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नद्यांना तब्बल तीनदा पूर आल्याने अधिकतम गावातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ...
यंदाच्या खरिपात तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद नद्यांना तब्बल तीनदा पूर आल्याने अधिकतम गावातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पुढील काळात तुडतुडा, रोग व परतीच्या पावसानेदेखील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परिणामी तालुक्यातील भागडी, विरली(बु), लाखांदूर, बारव्हा व मासळ या पाचही मंडळांतील पीक उत्पादकतेत घट होऊन पैसेवारीतही घट झाली आहे. सदर घट लक्षात घेता जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे माजी सभापती चंद्रशेखर टेंभूर्णे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी गुरुवार रोजी येथील तहसील कार्यालयासमोर तालुक्याची अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखवून तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीला घेऊन आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनाची दखल घेत येथील तालुका महसूल प्रशासनाने अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी जाहीर केल्याने तालुका दुष्काळग्रस्त घोषित होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
दरम्यान, सदर पैसेवारी तालुक्यातील सर्वच ८९ गावात कमी दाखविण्यात आल्याने निर्धार आंदोलनाचे यश असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सदर आंदोलनांतर्गत चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी राज्य शासनाने तालुक्याची पैसेवारी लक्षात घेता शेतकऱ्यांना पीक विम्यासह दुष्काळाचा लाभ मिळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व नागरिक उपस्थित होते.