लाखांदूर तहसील कार्यालयाचा लिलाव चार हजार १०० रुपयांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:12+5:302021-09-02T05:16:12+5:30
रब्बी हंगामात आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. तब्बल अडीच महिने झाले तरी चुकारे मिळाले नाही. तसेच खरिपातील ...
रब्बी हंगामात आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. तब्बल अडीच महिने झाले तरी चुकारे मिळाले नाही. तसेच खरिपातील बोनसची ५० टक्के रक्कमही थकीत आहे. शासनाने तत्काळ रक्कम अदा करावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मंगळवारी तहसील कार्यालय लिलाव आंदोलन केले. दुपारी आंदोलक तहसीलपुढे एकत्र झाले. लिलावात सहभाग होण्यासाठी नागरिकांकडून ५० रुपये अनामत रक्कम जमा करण्यात आली. त्यानुसार धनराज कापगते, रवींद्र चुटे, निखिल कावळे, अतुल राघोर्ते, विक्की खोटेले, धनराज हटवार, गुणवंत ढोरे, हेमलता लांजेवार, रोहित सावरबांधे, दुधराम बावनकर, पवन राऊत आदींनी लिलावात बोली लावली. या वेळी रवींद्र चुटे यांनी चार हजार १०० रुपयांत तहसील कार्यालय घेतले.
आंदोलनात प्रहार जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी, उपप्रमुख धनराज हटवार, प्रमुख चंद्रशेखर टेंभुर्णे, खेमराज भुते, हेमलता लांजेवार, छाया शेंडे, आदेश शेंडे, अरविंद राऊत, जागेश्वर पाथोडे, जगदीश राखडे, नागसेन सोनवाने, पवन राऊत, अशोक बोरकर, प्रवीण तोंडरे, निखिल कावळे, रामप्रकाश समरीत, बाळा राऊत, गुरुदेव मरसकोल्हे, विक्की भुरले सहभागी झाले होते. पोलिसांनी चोक्ष बंदोबस्त लावला होता.
आठ शेतकऱ्यांना दिली लिलावाची रक्कम
लिलावाचे वेळी प्रतितहसीलदार म्हणून निखिल कावळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. लिलावाअंतर्गत जमा झालेले सुमारे चार हजार १०० रुपये रब्बी धान चुकाऱ्यापासून वंचित आठ शेतकऱ्यांना देण्यात आली. मागण्या तत्काळ मंजूर करण्यासाठी तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्या दालनात जाऊन चर्चा करण्यात आली. या आंदोलनाची दिवसभर चर्चा होती.
310821\1647-img-20210831-wa0022.jpg
नविन तहसिलदाराची नियुक्ती करतांना प्रहारचे जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी व आंदोलनातील कार्यकर्ते