लाखनी तालुक्यात २० हजार ६५९ मतदारांनी बजावला हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:31+5:302021-01-17T04:30:31+5:30
लाखनीः तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या असून तालुक्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी ८४.२९ टक्के एवढी आहे. ...
लाखनीः तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या असून तालुक्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी ८४.२९ टक्के एवढी आहे. तालुक्यात २० हजार ६५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यात १० हजार ५०३ पुरुष व १० हजार १५६ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात दुपारनंतर मतदानाचा उत्साह दिसून आला. सकाळी ७.३० ते ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी २७.९१ टक्के एवढी होती. सकाळी ७.३० ते १.३० वाजेपर्यंत ५५.८० टक्के व सकाळी ७.३० ते ३.३० वाजेपर्यंत ७२.५९ टक्के मतदान शांततेत पार पडले. दिव्यांग व वृद्धांनीही मतदानाचा हक्क बजावला.
तालुक्यातील सोमलवाडा, किन्ही, दैतमांगली, रेंगेपार, (कोठा), परसोडी, सिंदिपार, (मुंडीपार),खैरी, खेडेपार, रेंगोळा, चान्ना, सिपेवाडा, धाबेटेकडी, शिवनी, रामपुरी, (नान्होरी), रेंगेपार (कोहळी), डोंगरगाव, (साक्षर), सोनमाळा, झरप, लोहारा (नरव्हा), पोहरा या २० गावांतील ३१४ उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले. १८ जानेवारी रोजी सकाळी मतमोजणीला स्थानिक तहसील कार्यालयात प्रारंभ होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम करण्यात आली आहे. २० ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. प्रत्येक गावात पॅनल लढविण्यात आली आहे. विजयी पॅनेल स्वतःचा सरपंच व उपसरपंच बनविणार त्याबाबतीची आकडेमोड सुरू आहे.
बॉक्स
मेंढा व गठपेंढरी येथे शुकशुकाट
पोहरा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मेंढा व गठपेंढरी या गट ग्रामपंचायतच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे प्रभाग क्रमांक ५ ची निवडणूक पार पडली नाही. उमेदवार व लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. निवडणुकीच्या दिवशी गावात शुकशुकाट होता. स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी महसूल प्रशासनाकडे लावून धरली आहे.
बॉक्स
निधनापूर्वी केले मतदान
लाखनी तालुक्यातील धाबेटेकडी येथील जानबा अंताराम खेडकर (वय ८२) यांनी शुक्रवारला सकाळी ११.३० वाजता जि. प. प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर प्रभाग क्रमांक १ चे मतदार म्हणून मतदान केले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य चांगले नव्हते. शनिवारी दुपारी एक वाजता त्यांचे निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.