लाखांदुरात पैसेवारी विरोधात शेतकऱ्यांचे धरणे
By admin | Published: December 21, 2015 12:39 AM2015-12-21T00:39:34+5:302015-12-21T00:39:34+5:30
तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५० टक्केच्या वर पैसेवारी दाखविली...
दुष्काळ घोषित करा : हजारो शेतकऱ्यांचा सहभाग
लाखांदूर : तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन कापनी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन ५० टक्केच्या वर पैसेवारी दाखविली असल्याने ती रद्द करुन ५० टक्केच्या आत पैसेवारी जाहिर करुन लाखांदूर संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावे, या मागणीला घेऊन हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले.
चालू वर्षात पावसाची सरासरी निम्यावर आली. तर रोगामुळे धानपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न यात मोठी तफावत आल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात पुरता सापडला. पिक कर्ज, सावकराकडील कर्ज, उसनवार रक्कम घेतल्याने व उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी रडकुंडीवर आला. अशातच प्रशासनाने इंग्रजकालीन १०० वर्ष जुनी आणेवारी व उंबरठा पद्धतीन काढलेली आणेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त येत नसतांना तलाठ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून कापणी व मळणी न करता खोटे पंचनामे तयार करुन आणेवारी ५० टक्केपेक्षा जास्त नोंदवून शासनाला सादर केली असल्याचा आरोप माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केला. खुद्द टेंभुर्णे यांनी प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात १२ प्लॉट आणेवारी काढण्यासाठी दिले होते.
त्यांची भेट घेवून तपासले असता तलाठ्यानी केलेले पंचनामे व टेंभुर्णेसह शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केलेले पंचनामे यात मोठी तफावत दिसून आली. एकूणच तलाठ्यांचे पंचनामे बनावट असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी सुद्धा प्रशासनाच्या आणेवारीला विरोध केला. यापुर्वी अशाच प्रकारे आणेवारी चूकीची काढल्याने चंद्रशेखर टेंभुर्णे, यांनी आंदोलन केले होते. अखेर प्रशासनाने माघार घेत ३४ गावातील आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी केली होती. त्यामुळे तलाठयांच्या बेजवाबदारपणाच्या निषेधार्थ व लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत व बॅकेतील सोनेतारण कर्ज माफ करावे, या मागण्यांना घेवून शेतकऱ्यांचा उपस्थीतीत धरणे आंदोलन समाजकल्याण सभापती चंद्रशेखर यांचे नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी पं.स. सभापती वासूदेव तोंडरे, देवचंद कावळे, भोजराज राऊ त, मनोज ढेंगरी, प्रानेश्वर कावठे, दिगांबर साठवणे, काशीनाथ हत्तीमारे आंदोलनात सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)