सिल्लीच्या पतसंस्थेत ‘लक्ष्मी’ घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 01:33 AM2016-05-26T01:33:31+5:302016-05-26T01:33:31+5:30
सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या व्याजाच्या भूलथापा देण्यात आल्या. गावातीलच पतसंस्था असल्याने ग्रामस्थांनी संस्थापक
ग्राहकांची न्यायासाठी धडपड : तारण सोने लांबविले, संस्थापक, व्यवस्थापकांचा मनमानी कारभार
भंडारा : सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या व्याजाच्या भूलथापा देण्यात आल्या. गावातीलच पतसंस्था असल्याने ग्रामस्थांनी संस्थापक व व्यवस्थापकांच्या भूलथापांना बळी पडलेल्यांना कोट्यवधींचा चूना लावण्यात आला. तारण म्हणून ठेवलेले सोने असो वा फिक्स ठेवलेली रक्कम यांचा कोट्यवधींचा घोटाळा करून नागरिकांना लुबाळण्यात आले. हा प्रकार घडला सिल्ली येथील लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत.
भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील कृष्णकांत देशमुख यांनी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था काही वर्षापूर्वी उघडली. या संस्थेने व्याप वाढविण्यासाठी प्रतिनिधी नेमले. सुरूवातीला या पतसंस्थेने पादरर्शक काम केल्याने ती अल्पावधीतच नागरिकांच्या जिव्हाळ्याची पतसंस्था बनली. यामुळे सिल्ली व परिसरातील नागरिकांनी विश्वास ठेवून दैनिक बचत, फिक्स डिपॉझिट, सुवर्णतारण कर्ज यात नागरिकांनी रक्कम व दागिणे गुंतविले. कालावधीनंतर काही नागरिकांनी त्यांनी सुवर्णतारणचे कर्ज फेडून त्यांचे दागिणे परत मागितले. यावेळी पतसंस्थेने त्यांना दागिणे परत करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा अवधी मागितला. मात्र सध्या महिन्याभराचा कालावधी लोटला असतानाही ग्राहकांचे दागिणे परत करण्यास उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी संस्थापक देशमुख यांची भेट घेतली. मात्र त्यांनीही हातवर केले. दरम्यान ते मागील महिनाभरापासून पसार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
ग्राहकांनी तक्रारीत आरोप केला की, देशमुख यांनी ग्राहकांच्या पैशाची अफरातफर करून स्व:ताच्या नातेवाईकाला लाभ मिळवून दिला आहे. अशा देशमुख यांच्यासह त्यांच्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर अफरातफरीचा गुन्हा दाखल करून ग्राहकांच्या घामाचे पैसे परत मिळवून द्यावे, अशा मागणीचे निवेदन सहाय्यक निबंधक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. शिष्टमंडळात ईश्वर माकडे, हरिदास गभणे, खेमचंद कळंबे, दिलीप गभणे, राजेश बागडे, प्रभावती हटवार, प्रभा लांजेवार, आदींसह ग्रामस्थांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)