तीन दशकांपासून लेंडेझरी तलाव उपेक्षित
By admin | Published: July 11, 2016 12:25 AM2016-07-11T00:25:48+5:302016-07-11T00:25:48+5:30
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा अशी ख्याती असली तरीही आजही कित्येक तलाव दुरूस्ती नियोजन, वितरिका व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.
फटका वनकायद्यातील जाचक अटींचा
रामचंद्र करमकर आलेसूर
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा अशी ख्याती असली तरीही आजही कित्येक तलाव दुरूस्ती नियोजन, वितरिका व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.
आंतर जिल्हा व महाराष्ट्रातील सेवटच्या टोकावरील ३५ कि़मी. अंतरावरील आदिवासी बहुल गाव लेंडेझरी येथील सार्वजनिक बांधकाम, लघु पाटबंधारे उपविभागा अंतर्गत लेंडेझरी तलावातील व नहराचे दुरूस्ती करणाचे काम ३३ वर्षापासून विकासाच्या प्रतिक्षेत आहे. परिणामी लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षित धोरणाअभावी तलाव भकास व्यवस्थेत पडला आहे.
सदर तलावाचे बांधकाम जानेवारी १९७९ ला पुर्णत्वास झाले. परंतु ३३ वर्षाचा कालखंड लोटूनही या तलावाचे उपसाकरण व दुरूस्तीकरण न झाल्यामुळे जलस्त्रोताचा व्याप व प्रचंड पालापाचोळा व गाळ साचलेला आहे. १३ फेब्रुवारी १९८३ मध्ये एकदा या तलावातील खोली करणाचे कामे सुरू करण्यात आले. मात्र तलावातील २.४९ हे.आ. भुभाग आरक्षीत वन कक्षात मोडत असल्यामुळे या दुरूस्तीवर वन विभागाने प्रतिबंध घातला. परिणामी सिमांकित आदिवासी शेतकऱ्याची ९.३० हे.आर. शेतजमीन सिंचना अभावी प्रभावित झाली.
कधी काळी पावसाने दडी मारली तर कोरडवाहू शेतकऱ्यांना हाच तलाव तारणहार ठरतो. स्थानिक नागरिकांनी ग्रामसभेत या तलावाच्या विकासा संदर्भात वारंवार ठराव पारित केला व संबंधित विभागाला सुद्धा निवेदन, अर्ज सादर केले परंतु यासंबंधी यश आले नाही. या संदर्भात आदिवासी नागरिक म्हणाले की वनकायद्याची बाब केंद्र शासनाशी संलग्नीत असून आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे जवाबी उत्तर अधिकारी वर्गाकडून मिळत आहेत. प्रतिवर्ष पावसाळ्यात या तलावात विविध वनकक्षातून पालापाचोळा, केरकचरा, गाळ येत असल्याने हा तलाव गिळंकृत होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परिणामी भविष्यात वन्यपशु-पक्षी व गुरांना पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, याची शक्यता नाकारता येत नाही.