गावतलाव मोजताहेत अखेरच्या घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:21 AM2019-04-19T00:21:26+5:302019-04-19T00:22:25+5:30
मालगुजारी काळापासून गावात उताराच्या ठिकाणी तलाव बांधल्या गेले. या तलावामुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली. काळानुरुप तलावाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत.
मुखरु बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : मालगुजारी काळापासून गावात उताराच्या ठिकाणी तलाव बांधल्या गेले. या तलावामुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली. काळानुरुप तलावाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत.
भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावाच्या भरोश्यावर भात शेती केली जाते. गुराढोरांची तहान भागते. नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळते. तलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ व्हायची. पंरतू आता सर्वच तलावच धोक्यात आले आहेत. पाणी बचतीकडे जसे दुर्लक्ष झाले तसेच तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुर्वी अथांग दिसणारे तलाव आता डबक्या समान झाले आहे. परिणामी गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहे.
या गावतलावांचे पुर्नरुज्जीव करण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन वर्षापुर्वी लाखनीचे तहसीलदार राजीव शक्करवार व नायब तहसीलदार विनोद थोरवे यांनी लोकसहभागतून गाळ उपसा केला. त्यावेळी नागरिकांनी सहकार्य केले. पंरतू आता याकडे दुर्लक्ष होत आहे.
देवरीगोंदी तलावाचे असेच ४० वर्षांपासून भिजत घोंगडे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी आमदार बाळा काशिवार यांना तलावाची हकीकत सांगितली. त्यानंतर या तलावाचे काम हाती घेण्यात आले. वर्षभरात तलाव व कालव्याचे काम केले. दृष्काळ सदृष्य परिस्थितीत हा तलाव आता जीवनदायी ठरत आहे. असेच सर्व तलावांसाठी केल्यास जिल्ह्यातील तलाव उन्हाळ्यातही पाण्याने तुडूंब भरुन राहतील.