ब्रिटिशकालीन तुमसर टाउन रेल्वेस्थानक इमारत मोजते शेवटची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:19+5:302021-09-24T04:41:19+5:30
तुमसर : ब्रिटिशकालीन तुमसर टाउन रेल्वेस्थानक शेवटची घटका मोजत असून इमारतीचे आयुष्य संपल्यात जमा आहे. तालुकास्थळावरील रेल्वेस्थानकात मूलभूत सोयीसुविधांचा ...
तुमसर : ब्रिटिशकालीन तुमसर टाउन रेल्वेस्थानक शेवटची घटका मोजत असून इमारतीचे आयुष्य संपल्यात जमा आहे. तालुकास्थळावरील रेल्वेस्थानकात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून परिसरात गवत व झुडुपी वनस्पती वाढल्या आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी साधी जागाही नाही.
ब्रिटिशांनी १९०२ च्या सुमारास तुमसर ते तिरोडीदरम्यान रेल्वे ट्रॅक तयार केले होते. त्यावेळी मँगेनिज वाहतूक करण्यासाठी रेल्वेस्थानकाचे बांधकाम करण्यात आले. तुमसर तालुका मुख्यालय असून येथे मोठे रेल्वेस्टेशन होते. परंतु, काळाच्या ओघात रेल्वेस्टेशन आपली ओळख विसरले. रेल्वेस्थानकाचे आयुष्य संपल्यागत झाले आहे. ब्रिटिशकाळात येथे मँगेनिजसाठा करणारे केंद्र होते. येथून मँगेनिजची उचल देश-विदेशांत होत होती. त्यानंतर प्रवासी गाडी सुरू करण्यात आली. दिवसातून या मार्गावर चार वेळा प्रवासी गाडी ये-जा करते. दरदिवशी ४०० ते ५०० प्रवासी प्रवास करतात. तुमसर शहराची लोकसंख्या सुमारे ६० हजार आहे. रेल्वे प्रशासनाने येथील रेल्वेस्थानकात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. रेल्वे प्रवाशांना बसण्याकरिता येथे बाके नाहीत. त्यामुळे शेकडो प्रवाशांना उभे राहूनच प्रतीक्षा करावी जागते. रेल्वेस्थानकात शेड नाही, त्यामुळे पावसाळा, उन्हाळ्याच्या दिवसांत झाडाखाली आसरा घ्यावा लागतो.
रेल्वेस्थानकाची मुख्य इमारत लहान असून तिचे आयुष्य संपले आहे. येथे भाडेतत्त्वावर रेल्वे प्रशासनाने तिकीट विक्री केंद्र सुरू केले आहे. संपूर्ण रेल्वेस्थानक परिसरात गवत व खुरट्या वनस्पती वाढल्या आहेत. तुमसर रोड रेल्वेस्थानक येथून केवळ पाच किलोमीटर अंतरावर आहे. तेथून हावडा-मुंबई रेल्वेमार्ग जातो. तिरोडी, कटंगी, बालाघाट, जबलपूर असा रेल्वेमार्ग या स्थानकातून जातो. तरी, हा महत्त्वपूर्ण रेल्वेमार्ग आजही उपेक्षित आहे.
बाॅक्स
रेल्वेमंत्र्यांना पाठविले निवेदन
स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठविले आहे. त्यात या रेल्वेमार्गावर दुस-या रेल्वे ट्रॅकचे बांधकाम करण्यात यावे. प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी. प्रतीक्षालयाचे बांधकाम, आरक्षणाची सोय, प्रवाशांना बसण्यासाठी शेडनिर्मिती, रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुनील मेंढे, आमदार परिणय फुके यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
कोट
तुमसर येथे रेल्वे प्रशासनाकडे मोठी रिकामी जागा उपलब्ध आहे. त्या जागेचा वापर रेल्वे प्रशासनाने करून अत्याधुनिक रेल्वेस्थानक येथे बांधकाम करण्याची मागणी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ. चंद्रशेखर भोयर, नगरसेवक रजनीश लांजेवार, पंकज बालपांडे, सचिन बोपचे, श्याम धुर्वे, सुनील पारधी, मुन्ना पुंडे, रेल्वे समिती सदस्य आशिष कुकडे, काशिराम टेंबरे, यशवंत कुर्जेकर, हनुमंत मेटे, कन्हैयालाल जीभकाटे यांनी केली आहे.