चार दशकांपासून भारत-तिबेट मैत्री संघाची भूमिका मोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:16 PM2018-08-08T22:16:27+5:302018-08-08T22:16:49+5:30

भारतीय जनतेत तिबेटच्या समस्येबाबत जागृती निर्माण करण्याचे संपूर्ण श्रेय तिबेट मित्र आणि समर्थकांचे आहे. भंडाऱ्यातील भारत-तिबेट मैत्री संघाने गत चार दशकांपासून तिबेटी मुक्ती संघर्षाची मशाल अवितर तेवत ठेवून सक्रिय व मोलाची भूमिका पार पाडली आहे.

For the last four decades, the role of the Indo-Tibet Friendship team has been significant | चार दशकांपासून भारत-तिबेट मैत्री संघाची भूमिका मोलाची

चार दशकांपासून भारत-तिबेट मैत्री संघाची भूमिका मोलाची

Next
ठळक मुद्देलोबसांग सांगेय : भंडारा येथे तिबेटी राष्ट्रपतींचे भावपूर्ण स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतीय जनतेत तिबेटच्या समस्येबाबत जागृती निर्माण करण्याचे संपूर्ण श्रेय तिबेट मित्र आणि समर्थकांचे आहे. भंडाऱ्यातील भारत-तिबेट मैत्री संघाने गत चार दशकांपासून तिबेटी मुक्ती संघर्षाची मशाल अवितर तेवत ठेवून सक्रिय व मोलाची भूमिका पार पाडली आहे. याची आम्हाला आणि पूज्य दलाई लामा यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच भंडाऱ्यातील जनतेकरिता दलाई लामा यांचे आशीर्वाद घेवून आलो आहे. त्याचा सर्वांनी स्वीकार करावा, असे प्रतिपादन निर्वासित तिबेट सरकारचे राष्ट्रपती डॉ. लोकसांग सांगेय यांनी केले.
भारत-तिबेट मैत्री संघ भंडाराच्या वतीने तिबेट मित्र व समर्थकांच्या सहकार्याने सर्किट हाऊस येथे आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारत-तिबेट मैत्री संघाचे राज्य महासचिव अमृत बन्सोड होते.
डॉ. लोकसांग सांगेय म्हणाले, भारत सरकार आणि भारतीय जनतेने तिबेट आणि तिबेटी जनतेकरिता खूप काही केले आहे. दलाई लामा यांना व त्यांच्यासाठी आलेल्या ८० हजार तिबेटी नागरिकांना भारतात येऊन ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने तिबेटी सरकार व तिबेटी जनतेने भारताविषयी आभार व्यक्त करण्याकरिता 'थँक यू इंडिया' अर्थात धन्यवाद भारत हे कँपेन सुरू केले आहे. तिबेटवर चिनी कपड्यापासून आतापर्यंत तिबेटी समुदायाकरिता भारताने जेवढे केले तेवढे कोणत्याच देशाने केले नाही. आम्ही अहिंसा, शांती माणणारे व कायदा पाळणारे बौद्धधर्मीय लोक आहोत. त्यामुळे जगभरातील तिबेटी समुदायाचा कुणालाही मुळीच धोका नाही.
भारताने केलेली मदत, सहकार्य व सहानुभूतीविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तिबेटच्या समस्यांच्या समाधानाकरिता भारताने त्यांना असेच सहकार्य करण्याचा आग्रह केला, नवी दिल्लीने चीन-भारत द्विपक्षीय चर्चेत तिबेटचा मुद्दा ठेवण्याची विनंती केली आणि भारत-तिबेटीयन समुदाच्या परस्पर विश्वास व संबंधात वृद्धी होवो, अशी आशाही व्यक्त केली.
डॉ. लोबसांग सांगेय यांचे सभास्थळी आगमन होताच प्रवेशद्वारावरच भारत-तिबेट मैत्री संघाचे राज्य महासचिव अमृत बन्सोड, भंडारा जिल्हा सचिव मोरेश्वर गेडाम, उपाध्यक्ष गुलशन गजभिये यांनी त्यांच्या तिबेटी परंपरेने पांढरा स्कार्प देऊन स्वागत केले. त्यानंतर उपस्थित तिबेट मित्रांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दलाई लामा यांचा आशिर्वाद प्राप्त अतीथी नावाच्या सहा वर्षीय बालिकेने सुद्धा त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करताच त्यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यानंतर डॉ. सांगेय यांनी कृतज्ञतेच्या भावनेने उपस्थित सर्वापर्यंत पोहचत हस्तांदोलन करीत अभिनव पद्धतीने आभार व्यक्त केले.
याप्रसंगी नोरगॉलींग सेटलमेंट कॅम्पचे सेटलमेंट आॅफीसर गोन्यो पेलरल, सभापती छो गॅलसन यांची विशेष उपस्थिती होती.
प्रास्ताविक व संचालन मैत्री संघाचे राज्य महासचिव अमृत बन्सोड यांनी तर आभार प्रदर्शन माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी यांनी केले. याप्रसंगी मैत्री संघाचे सचिव मोरेश्वर गेडाम, उपाध्यक्ष गुलशन गजभिये, महादेव मेश्राम, एम. डब्ल्यु. दहिवले, असित बागडे, अविनाश साखरे, अजय तांबे, रामदास शहारे, करण रामटेके, गोवर्धन चौबे, अ‍ॅड. संजीव गजभिये, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, मकसूद पटेल, अर्जून गोडबोले, शुभांगी गौतम सरादे, लता करवाडे, नेहा शेंडे, निर्मला गोस्वामी, मोरेश्वर गजभिये, रमेश जांगळे, आहुजा डोंगरे, आदिनाथ नागदेवे, आनंद गजभिये, नरेंद्र बन्सोड, उपेंद्र कांबळे, सुरेश सतदेवे, पी.डी. शहारे, अशोक बन्सोड, शहारे, अतुल कांबळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: For the last four decades, the role of the Indo-Tibet Friendship team has been significant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.