साश्रूनयनांनी शहिदांना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:51 AM2019-05-03T00:51:23+5:302019-05-03T00:51:56+5:30
महाराष्ट्रदिनी वीर मरण आलेल्या भंडारा जिल्ह्यातील तीन तरूणतुर्क जवानांना आज हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. वीर जवान अमर रहे, भारत माता की जय या घोषणांसह नागरिकांनी आसमंत दणाणून सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी/साकोली/दिघोरी (मोठी) : महाराष्ट्रदिनी वीर मरण आलेल्या भंडारा जिल्ह्यातील तीन तरूणतुर्क जवानांना आज हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. वीर जवान अमर रहे, भारत माता की जय या घोषणांसह नागरिकांनी आसमंत दणाणून सोडला. विशेष म्हणजे तिन्ही जवानांचे पार्थिव अंत्ययात्रेसाठी घरातून काढण्यात आले तेव्हा हुंदके व आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.
दिघोरी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथून विशेष वाहनातून तिनही जवानांचे पार्थिव भंडारा जिल्ह्यात आणण्यात आले. यात दिघोरी मोठी येथील शहीद जवान दयानंद ताम्रध्वज शहारे यांचे पार्थिव सायंकाळी ६ वाजता गावात पोहोचले. दिघोरी टी-पॉर्इंटवर ग्रामस्थ शेकडोच्या संख्येने एकत्रीत आले होते. टी-पॉर्इंट ते शहारे यांच्या घरापर्यंतचा रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे राहून लाडक्या जवानाला अभिवादन करीत होते. पार्थिव घरी येताच एकच आक्रोश झाला. शहीद दयानंद यांची पत्नी बेशुद्ध पडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी बौद्ध विहारासमोर शहीद दयानंदला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रध्वजात गुंडाळलेले पार्थिव सजविलेल्या वाहनातून चुलबंद नदी घाटाकडे नेण्यात आले. यावेळी शहीदाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी बंदुकीच्या फैऱ्या झाडून मानवंदना दिली. शहीद दयानंद यांचा पुतण्या धम्मू अरुण शहारे याने मुखाग्नी दिली. अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीते वाजविली जात होती. गावात शोकपूर्ण वातावरण तर गुरूवारी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आले. यावेळी आमदार बाळा काशीवार, माजी आमदार सेवक वाघाये, जि.प.सदस्य माधुरी हुकरे, भरत खंडाईत यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
साकोली येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, कुंभली येथील शहीद जवान नितीन तिलकचंद घोरमारे यांचे पार्थिव रात्री ७ वाजता घरी आणण्यात आले. उपस्थितांनी भारत माता की जय, शहीद जवान नितीन अमर रहेच्या घोषणा दिल्या. लाडक्या नितीनला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गावात गर्दी केली होती. सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अमर रहेच्या घोषणा देत नितीनचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी कुंभली येथील चुलबंद नदीपात्राकडे आणण्यात आले. यावेळी शासकीय इतमामात नितीनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैºया झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार बाळा काशीवार, माजी आमदार सेवक वाघाये, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, दीपक मेंढे, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार बाबासाहेब केळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे, नगरसेवक रवी परशुरामकर, मनिष कापगते, गावातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.
लाखनी येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, शहीद जवान भुपेश वालोदे यांचे पार्थिव रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास लाखनी येथे आणण्यात आले. राष्ट्रध्वजात गुंडाळलेल्या भुपेशच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घरातून निघालेल्या अंत्ययात्रेत रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून लाडक्या भुपेशला साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. भुपेश अमर रहेच्या घोषणांनी आसमंत दणाणले. भुपेशला मोठी मुलगी असून ती चार वर्षांची आहे. उल्लेखनीय म्हणजे शहीद भुपेशची पत्नी ही सहा महिन्यांची गर्भवती आहे.
चार महिन्यांच्या छकुलीचे पितृत्व हरविले
कुंभली येथील शहीद नितीन घोरमारे दाम्पत्याला चार महिन्यांची एक कन्या आहे. पार्थिव घरी आणताच शहीद नितीनच्या पत्नीची अवस्था दयनीय झाली होती. चार महिन्यांची चिमुरडी आपल्या बाबांना कधीच पाहू शकणार नाही, हा भाव उपस्थित प्रत्येकाच्याच चेहºयावर दिसत होता. ओवी या छकुलीचे पितृत्व हरपले होते. प्रत्येकाच्या मनातील दाटून येणारा हुंदका अश्रूंच्या रूपाने वाहन होता.
वाढदिवसालाच दिला अखेरचा निरोप
दिघोरी मोठी येथील शहीद दयानंद शहारे यांचा गुरूवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी त्यांना अखेरचा निरोप देण्याचा दुदैवी प्रसंग शहारे कुटुंबिया आला. उल्लेखनीय म्हणजे शहीद दयानंद यांची लहान मुलगी अनुष्का ही सहा महिन्यांची आहे. बाबा आज गेले, ते कधीही परत न येण्यासाठी ही भावनाही कदाचित कळली नसावी. पाषाणाही पाझर फुटावा, असा हा क्षण होता.