पालांदूर परिसरात रोवणी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:00 PM2018-07-22T22:00:43+5:302018-07-22T22:02:00+5:30
मागील दोन आठवड्यापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पालांदूर परिसरात रोवणीची कामे अंतिम टप्प्यापर्यंत पोहचली आहेत. दुसरीकडे मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजाचे टेंशन मात्र वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : मागील दोन आठवड्यापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पालांदूर परिसरात रोवणीची कामे अंतिम टप्प्यापर्यंत पोहचली आहेत. दुसरीकडे मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजाचे टेंशन मात्र वाढले आहे.
पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १० हजार ७०७ हेक्टरवर धान लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४ हजार १६८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी आटोपली आहे. ४५६ हेक्टर परिसरात आवत्यांची लागवड केली असून ८०८ हेक्टरवर तुर पिकाची लागवड करण्यात आली आहे. तुर पिकाची लागवड ७९७ बांध्यांमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय २८ हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे.
मंडळ कार्यालय अंतर्गत अधिकाऱ्यांची चमू शेतशिवारात जावून शेतकºयांना सुधारित पद्धतीने धानाची लागवड व अन्य पिकांबाबत मार्गदर्शन करीत आहेत. पालांदूर, घोडेझरी, मचारणा, जेवनाळा, नरव्हा, पाथरी येथील धान पºह्याची लागवड पट्टा पद्धतीने कशी करता येईल याबाबत मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके, वरिष्ठ भात पैदासकार डॉ.जी.आर. शामकुवर व अन्य कर्मचारी मार्गदर्शन करीत आहेत. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींना पावसाची चांगली साथ लाभली आहे.
यावर्षी भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ झालेली दिसून येते. तसेच तुर पिकाच्या लागवडीतही वाढ झाली आहे.
या संदर्भात मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके म्हणाले, शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान अवलंबित आहे. बाजारपेठेचे निरीक्षण करून शेती कसण्याकडे लक्ष दिले जात आहे. परिसरात भाजीपाल्यांच्या शेतीला उत्तम वाव मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.