अखेर पालकांनीच दिले ‘नवोदय’ला सौर हिटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:32 AM2018-12-07T00:32:53+5:302018-12-07T00:34:22+5:30
जवाहर नवोदय विद्यालय ऐनकेन प्रकारे चर्चेत राहत असून याचा त्रास तेथे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना होत आहे. हिवाळ्याच्या दिवसातही या विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आघोळ करावी लागत होती. हा प्रकार पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जवाहर नवोदय विद्यालय ऐनकेन प्रकारे चर्चेत राहत असून याचा त्रास तेथे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना होत आहे. हिवाळ्याच्या दिवसातही या विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आघोळ करावी लागत होती. हा प्रकार पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र कोणतीही उपाययोजना झाली नाही. अखेर पालकांनी एकत्र येवून लोकवर्गनी केली आणि त्यातून ५० हजार रुपये किंमतीचे सौर उर्जा हिटर नवोदय विद्यालयाला भेट दिले.
भंडारा जिल्ह्याला हक्काचे नवोदय विद्यालय मिळावे म्हणून विविध आंदोलने करण्यात आली. अखेर याला यश आले. भंडारा जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालय मंजूर झाले. मात्र जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला जकातदार विद्यालयाच्या जुन्या इमारतीत नवोदय सुरु झाले. जिल्ह्याभरातील प्रज्ञावंत विद्यार्थी येथे शिक्षण घेवू लागले. मात्र याठिकाणी कोणत्याही सोईसुविधा नसल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यानंतर आंदोलन सुरु झाले. प्रशासनाने अल्पसंख्याक विभागाच्या इमारतीत नवोदय विद्यालय हलविले. परंतु त्यावरही पालकांचा आक्षेप होता. अखेर मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत नवोदय सुरु करण्यात आले.
मात्र या इमारतीत कोणत्याही सुविधा नाही. सहावी आणि सातवीचे जिल्हाभरातील विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सुरवातीला झोपण्यासाठी बेडही नव्हते. त्यावरुन बँक आॅफ इंडियाने आपल्या सामाजिक उपक्रमांतर्गत तेथे बेडची व्यवस्था केली. मात्र समस्या विद्यार्थ्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. हिवाळ्यात विद्यार्थ्यांना येथे थंड पाण्याने आंघोळ करावी लागत होती. पालकांनी प्रशासनाला निवेदन दिले. पंरतु प्रशासनाने हात वर केले. आपली मुले कुडकुडत्या थंडीत थंडगार पाण्याने आंघोळ करीत आहेत. आरोग्यावर परिणाम होईल म्हणून पालक अस्वस्थ झाले. प्रशासन ऐकत नसल्याचे पाहून पालकांनीच पुढाकार घेतला. जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती आणि पालकांकडून वर्गणी गोळा केली. तब्बल ५० हजार रुपये गोळा झाले. यातून सौरउर्जा हिटर विकत घेवून नवोदयमध्ये लावण्यात आले.
शुद्ध पाण्याचा अभाव
नवोदय विद्यालयात पाणी शुध्दीकरणाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे उपलब्ध असलेले अशुध्द पाणी विद्यार्थ्यांना प्राशन करावे लागते. आता आरो वॉटर प्लांट लावण्यासाठी पालकच पुढाकार घेत असून त्यासाठी पुन्हा लोकवर्गणी करण्याची तयारी पालकांनी चालविली आहे.