ऐकूया गुजगोष्टी उपक्रमाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:24 AM2021-02-19T04:24:02+5:302021-02-19T04:24:02+5:30
भंडारा : आंतरराष्ट्रीय भाषा दिनानिमित्त १४ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत ऐकूया गुजगोष्टी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. ...
भंडारा : आंतरराष्ट्रीय भाषा दिनानिमित्त १४ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत ऐकूया गुजगोष्टी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयात भाषाभ्यासाच्या शिक्षकांनी अध्यापन सुरू करण्यापूर्वी एखादी तरी गोष्ट सांगून मुलांमध्ये वाचन संस्कृतीचे बीज रूजवावे, वाचनाची गोडी लागावी म्हणून प्रयत्नशील राहावे, ऐकूया गुजगोष्टी, गोष्टींचा शनिवार हा उपक्रम सुरू करण्यात आला. गोष्टींमधून मूल्य रूजतात, संस्कारक्षम गोष्टींमुळे संस्कार घडतात म्हणून भाषा विषय शिक्षकांनी रोज एक गोष्ट सांगून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजवण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्या केशर बोकडे यांनी केले. उपक्रमाच्या शाळा संयोजक स्मिता गालफाडे यांनी नववी ‘ड’ या वर्गात गोष्ट सांगून उपक्रमाचा शुभारंभ केला.
सप्ताहाच्या शेवटी मुलांनी किती पुस्तके वाचली, किती गोष्टी ऐकल्या, त्या गोष्टींचे तात्पर्य काय, याचा आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय गोष्टीचा पूर्वार्ध ऐकून उत्तरार्ध पूर्ण करा, ऐकलेली गोष्ट साभिनय सादर करा, गोष्टीचे नाट्यिकरण करून सादरीकरण करा, गोष्टीतील मूल्यावर चर्चा करा, अशा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून भाषा उपक्रम राबवून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली जाणार आहे. शाळेच्या या उपक्रमात सर्वच भाषा शिक्षक सहभागी झाले आहेत.