भंडारा येथे जनआरोग्य योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:31 PM2018-09-24T22:31:00+5:302018-09-24T22:31:17+5:30
केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना घोषित केली असून या योजनेचा शुभारंभ रांची झारखंड येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे दाखविण्यात आले. तसेच या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते भगवान धन्वतरी यांच्या प्रतिमेलव माल्यार्पण करुन करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना घोषित केली असून या योजनेचा शुभारंभ रांची झारखंड येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे दाखविण्यात आले. तसेच या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते भगवान धन्वतरी यांच्या प्रतिमेलव माल्यार्पण करुन करण्यात आला.
यावेळी आमदार परिणय फुके, राजेश काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, आरोग्य सभापती प्रेमदास वनवे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक माधूरी थोरात, सामाजिक कार्यकर्ते सत्तार खान, मिरा भट आदी उपस्थित होते. आजचा दिवस गोरगरीब जनतेसाठी भाग्याचा दिवस आहे.
भारतात तरुणांची लोकसंख्या ३५ ते ४० टक्के आहे म्हणून जगात सर्वात युवा देश म्हणून भारताची गणना आहे. या सर्व व्यक्तींना ५ लाखापर्यंत मदत आरोग्याच्या माध्यमातून होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाने जोमाने कार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. देशाचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी आयुष्मान भारत योजना आहे. योजनेची नोंदणी सामान्य रुग्णालयात करावी. रुग्णालयात ई-कार्ड देण्यात येईल, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधूरी थोरात यांनी सांगितले की, केंद्र शासनाने आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेस २१ मार्च २०१८ रोजी मान्यता दिली आहे. या योजनेतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षण २०११ मधील कुटूंबांना प्रती कुटूंब ५ लाख रुपयांपर्यंत देशभरातील मान्यता प्राप्त रुग्णालयामधून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.
देशभरातील १०.७४ कोटी, महाराष्ट्र राज्यात ८३ लाख ८३ हजार ६६४ तर भंडारा जिल्हयात १ लाख ३४ हजार ४४८ कुटूंब आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्र आहेत. लाभार्थी कुटूंबाला प्रतीवर्षी प्रतीकुटूंब ५ लक्ष रुपयांचे मोफत आरोग्य विमा कवच मिळणार आहे. योजनेच्या लाभासाठी कुटूंबातील सदस्य संख्या, वय व लिंग यावर कोणतेही बंधन असणार नाही. देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त शासकीय किंवा खाजगी रुग्णालयामधून लाभ घेता येईल. रुग्णालयामध्ये नि:शुल्क भरती प्रक्रिया असेल. योजनेचा लाभ घेण्याकरीता योजनेचे ई-कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र असणे गरजेचे आहे. यावेळी सुशिला खंडारे, दिनेश बोरकर, गंगा गिरी, शाहिद अंसारी, ज्ञानेश्वर बोरकर, लिलाधर, गोन्नाडे, चंद्रकांत इडपाते, राम गोटेकर, गजानन गौतम यांना योजनेचे ई-कार्ड प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. संचालन डॉ. शांतीदास लुंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. संजय गटकुल यांनी मानले. जिल्हयातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर व आरोग्य सेवक उपस्थित होते.