शिवभोजन योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:00+5:30

२६ जानेवारीपासून भंडारा मुख्यालयी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभात माविमंच्या नवप्रभा लोकसंचलित केंद्र व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांच्याकडे कार्यादेश देवून करण्यात आला.

Launch of Shiv Bhojana Yojana | शिवभोजन योजनेचा शुभारंभ

शिवभोजन योजनेचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देगरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन : दहा रुपयात मिळणार थाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना २६ जानेवारीपासून भंडारा मुख्यालयी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभात माविमंच्या नवप्रभा लोकसंचलित केंद्र व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांच्याकडे कार्यादेश देवून करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड उपस्थित होते.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना सुरु करण्यात येत आहे. प्रति दहा रुपये थाळी याप्रमाणे जेवण गरजूंसाठी उपलब्ध असणार आहे. भोजनालय चालवण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टोरेंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची जिल्हावर निवड करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यासाठी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाचे भोजनालय व महसूल कँटिन या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या दोन संस्थांची निवड जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील समितीने केली असून शासन प्रत्येक थाळीसाठी शहरी भागामध्ये ५० रुपये तर ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये असे दर कंत्राटदारांना देणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकांकडून केवळ १० रुपये नाममात्र रक्कम घेतली जात जाणार आहे. असे असले तरी सदर थाळीची किंमत ही शहरी भागांमध्ये ५० रुपये व ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये असणार आहे. दहा रुपये वगळता अन्य रक्कम ही अनुदान असणार आहे. त्यामुळे या थाळीचा वापर गरजू गरीब नागरिकांसाठी व्हावा अशी अपेक्षा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. भंडारा मध्ये सद्यस्थितीत २०० थाळींचे प्रशासनाने नियोजन केले आहे.
भंडारा मध्ये ही सुविधा दोन ठिकाणी सुरु करण्यात आली असून जेवण दुपारी बारा ते दोन या कालावधीतच मिळणार आहे.
शिवभोजन थाळी अंतर्गत प्रत्येक संस्थेला अधिकाधिक दीडशे थाळी देणे अनिवार्य आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल. प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. भंडारा मध्ये २६ जानेवारी पासून जिल्हा परिषद,भंडारा येथे आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाचे भोजनालय व महसूल कॅटिन येथे शिवभोजन योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेने घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले आहे.

Web Title: Launch of Shiv Bhojana Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.