जेवणाळा येथे उन्हाळी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:35 AM2021-05-23T04:35:14+5:302021-05-23T04:35:14+5:30
यावेळी माजी सभापती विनायक बुरडे, संस्थेचे अध्यक्ष अनिल गोंधोळे, संचालक विठ्ठल गोंधोळे, दामोदर गिरेपुंजे, रमेश लुटे, गोपीचंद सोनवाने, मारोती ...
यावेळी माजी सभापती विनायक बुरडे, संस्थेचे अध्यक्ष अनिल गोंधोळे, संचालक विठ्ठल गोंधोळे, दामोदर गिरेपुंजे, रमेश लुटे, गोपीचंद सोनवाने, मारोती सेलोकेर, आनंदराव बोरकर, हरिभाऊ गिरेपुंजे, लोकेश उपरीकार तथा बहुसंख्येने शेतकरीवर्ग यावेळी उपस्थित होता.
१ मे हा उन्हाळी धान खरेदीचा ठरलेला मुहूर्त असतो, परंतु खरीप हंगामाचा धान भरडाईचा तिढा कायम राहिल्याने धान भरडाई होऊ शकली नाही. त्यामुळे खरिपाचे धान अजूनही खरेदी केंद्रावर पडून आहे. त्यामुळे बरेच धान खरेदी केंद्रे सुरू होऊ शकलेली नाहीत, परंतु ज्या खरेदी केंद्राकडे कोठाराची व्यवस्था आहे, अशा केंद्रांनी धान खरेदी सुरू केलेली आहे.
धान खरेदी करताना केंद्रांना जिल्हा पणन कार्यालयातर्फे मार्गदर्शन करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांनी गोडाऊन परिसरात धान सूचनेशिवाय आणू नये. पावसाचे दिवस असल्याने खरेदी केंद्राकडून सूचनेनुसारच मोजणीकरिता धान केंद्रात आणावे. संस्थेच्या संबंधित ग्रेडरकडे नोंदणी करावी. ३१ मेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. शासन निर्णयानुसार प्रतिक्विंटल १,८६८ रुपये असा दर निर्धारित केलेला आहे.
धान खरेदी केंद्रात शेतकऱ्याने रीतसर नोंदणी करावी. जी गावे ज्या केंद्राकडे जोडलेली आहेत, त्याच शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी केली जाईल. नोंदणी मात्र कोणत्याही केंद्रावरून स्वीकारली जाईल. नोंदणीनंतर ज्या ज्या केंद्रावर मोजणी सुरू होईल, तेव्हा आधीची नोंदणी अधिकृत धरली जाईल. गोडाऊन परिसरात शेतकऱ्यांनी धान आणून ठेवू नये. खरेदीला शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.
गणेश खर्चे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा
जेवणाळा केंद्रांतर्गत संबंधित उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी ३१ मेपर्यंत नोंदवावी. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचेच धान मोजले जाईल. केंद्राच्या परिसरात कुणीही धान आणून ठेवू नये. जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या सूचनेनुसार धान खरेदी केली जाईल.
पप्पू कानतोडे, ग्रेडर, जेवणाळा
डब्बा/चौकोन
गोडाऊन व्यवस्था शासनाकडे अपुरी आहे. गत कित्येक दिवसांपासून कोठार समस्या ‘आ’ वासून उभी आहे, परंतु शासनाच्या वतीने कोठार व्यवस्था वाढविण्याकरिता प्रयत्न अपुरे आहेत. अशा प्रसंगी कोठार व्यवस्था वाढविण्याकरिता नाबार्ड योजनेंतर्गत पंचवीस टक्के अनुदानावर कोठार बांधकाम योजना कार्यान्वित आहे. जेवणाळा येथील प्रगतिशील शेतकरी विनायक बुरडे यांनी काळाची पावले ओळखत, गोडाऊन बांधकाम योजनेंतर्गत लाभार्थी होत, स्वतःसह इतरही शेतकऱ्यांना बांधलेल्या कोठाराचा मोठा लाभ झालेला आहे, हे विशेष!