कायदा सुव्यवस्था ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:19 PM2017-12-19T23:19:00+5:302017-12-19T23:21:05+5:30
जिल्ह्यातील विविध ठाण्यांतर्गत मागील काही महिन्यांपासून गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्ह्यातील विविध ठाण्यांतर्गत मागील काही महिन्यांपासून गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यात पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. अनेक प्रकरणात आरोपींना अभय देणाºया पोलीस अधिकाऱ्यांनी अन्यायग्रस्त कुटुंबावर दडपण टाकण्याचा प्रकार अवलंबिला आहे. भंडारा शहरात आठवडाभरापूर्वी तर साकोली येथे महिनाभरापूर्वी व तुमसर येथे दोन महिन्यापूर्वी तर बेला येथे रविवारला रात्री खून झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप पत्रपरिषदेत केला.
भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, अखिल भारतीय माळी संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत भुसारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नंदूरकर, यांनी हा आरोप केला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढल्या आहेत. यावर अंकुश लावण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरली आहेत. अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय देण्यापेक्षा या कुटुंबावरच पोलिसांचा दबाव टाकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त कुटुंबाला न्यायापासून वंचित राहावे लागणार असून स्वत:चे अपयश लपविण्यासाठी पोलिसांनी दोषींना पाठीशी घालून निर्दोषांवर आरोप लावून अटकेची कारवाई करण्याचा घ्रृणास्पद प्रकार केल्याचाही आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला.
साकोली येथील सुशील बनकर, तुमसर येथील विक्की गोपलानी तर भंडारा शहरातील निहाल शेलारे या तरुणाच्या खुनातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप पत्रपरिषदेतून केला आहे. पत्रपरिषदेला काँग्रेस कमेटीचे तुमसर तालुकाध्यक्ष शंकर राऊत, प्रकाश अटाळकर यांच्यासह अन्यायग्रस्त कुटुंबिय उपस्थित होते.
साकोलीचे बनकर कुटुंबीय
साकोली येथील सुशिल बनकर यांचा नोव्हेंबर महिन्याच्या ८ तारखेला मुंडीपार गावाजवळ भंडाºयाकडे येत असताना संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनास्थळ लाखनी पोलीस स्टेशन हद्दीत येते. या प्रकरणात सुशील यांचा नियोजनबद्ध पद्धतीने खून करून मृतदेह घटनास्थळावर ठेवण्यात आले. यात पोलिसांनी अपघात घडल्याचे सांगितले असले तरी अपघातग्रस्त वाहन मात्र सुस्थितीत आहे. दरम्यान मृतक सुशीलच्या शरीरावर छातीजवळ खोल छिद्र असल्याने त्यांचा त्रयस्थ ठिकाणी खून करून मृतदेह अन्यत्र फेकल्याचा संशय यावरून येते. हा घातपात पैशाच्या वादातून झाल्याचा आरोप बनकर कुटुंबियांनी केला आहे. बनकर कुटुंबियांनी पोलिसांना संशयीत आरोपींचे नाव दिले असता पोलिसांनी त्यांना पाठीशी घालण्याकरिता बनकर कुटुंबियांचे नावे आरोपींना सांगून गोपनीयतेचा भंग करण्याचा संतापजनक प्रकार पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात लाखनी पोलिसांकडून तपास काढावा अशी मागणी सुनिल बनकर, मृतकाची पत्नी मनिषा बनकर व बनकर कुटुंबियांनी केली.
तुमसरचे कांबळे कुटुंबीय
तुमसर तालुक्यातील बोरी मार्गावर गोंदिया येथील व्यावसायीक विक्की गोपलानी यांची १७ आॅगस्टला हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी मुकेश कांबळे व हितेंद्र बेंदवार यांच्यावर खोटे आरोप लावून प्रकरणाशी संबंध नसतानाही आरोपी बनविले आहे. मृतकाच्या कुटुंबियाशी अगदी सलोख्याचे संबंध असताना पोलिसांना यातील मुख्य आरोपीचा शोध लावण्यात विलंब लावत असल्याने त्यांनी मुलगा व जावई यांना आरोपी केल्याचा आरोप बोरी येथील सुधाकर कांबळे यांनी केला आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून खºया आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रपरिषदेला सुधाकर कांबळे यांच्यासह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
कोटगाव येथील सेलारे कुटुंब
भंडारा तालुक्यातील कोटगाव (खरबी नाका) येथील निहाल सेलारे या १९ वर्षीय युवकाचा भंडारा शहरात ११ डिसेंबरला खून करण्यात आला. तो गावातीलच एका १७ वर्षीय तरुणीसह भंडारा शहरात भाड्याच्या घरी राहत होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अद्यापही अटक केलेली नसल्याचा आरोप मृतक निंहालचे वडील रमेश सेलारे यांनी केला आहे. ज्या तरुणीसह मृतक निहाल हा भंडाºयात राहत होता तिच्या आईला व बहिणीला या प्रकरणाची सविस्तर माहिती होती. निहालचा खून करून त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर आरोपींनी पळ काढला. दरम्यान त्यांनी मृतदेह रुग्णालयात आणला असताना तिथे मृतकाचे नातेवाईक असल्याचे कागदोपत्री नमूद केले. वास्तविकतेत मृतकासह त्याचे नातेवाईक नव्हते. त्यामुळे सध्या हे आरोपी कुटुंब गावातून पसार झालेले आहेत. सामान्य रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज बघितल्यास आरोपींचा शोध लागेल. मात्र पोलीस प्रशासनाने मृतकाच्याच आईवडीलांवर दबाव आणल्याचा आरोप रमेश सेलारे व उलमा सेलारे यांनी केला आहे.